ठाणे : थर्टी फर्स्ट अर्थात नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांसाठी नेहमीच चर्चेत असणाऱ्या ठाण्यातील निसर्गरम्य येऊर आणि उपवन परिसरातील हॉटेल व बंगलेधारकांना वर्तकनगर पोलिसांनी नोटीसा बजावली आहे. त्यानुसार अवैध पद्धतीने मदयविक्री आणि डीजे पार्ट्यांवर बंदी घातली असून बंगले भाड्याने देण्यावरही बंदी घातली आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या तळीरामांसह बंगले धारक आणि हॉटेल व्यावसायिकांच्या उत्साहावर विरंजण पडले आहे. पोलिसांनी येऊर व उपवन परिसरातील 258 बंगले, सात हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सना नोटीस बजावल्याने नाताळ आणि नववर्ष पार्टीच्या बेतात असलेल्या तळीराम पर्यटकांचे धाबे दणाणले आहेत.
ठाणे शहराच्या कुशीत हिरव्यागार टेकडीवर वसलेला निसर्गरम्य येऊर परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे.येऊरचा परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असल्याने हा परिसर सायलेन्स झोन घोषित करण्यात आला आहे. तर तलावामुळे उपवनही पार्ट्यांसाठी हॉट डेस्टिनेशन बनले आहे. त्यामुळे नववर्ष स्वागताचे निमित्त साधत हजारो ‘तळीराम’ पर्यटक 31 डिसेंबरला दरवर्षी याठिकाणी आपला मोर्चा वळवतात. दारू पिऊन धिंगाणा घालणे तसेच, मोठमोठ्या आवाजात बंगल्यात, हॉटेलच्या आवारात डीजे, गाणी लावून थर्टी फर्स्टचे ‘सेलिब्रेशन’करण्याचा ट्रेंड अनेक वर्षांपासून कायम आहे. मात्र वनविभाग, स्थानिक पोलीस, राज्य उत्पादन शुक्ल खात्यासोबत स्वयंसेवी संस्थांनीही तळीरामांची नाकेबंदी करण्यासाठी कंबर कसल्याने यंदा या जल्लोषावर विरंजण पडणार आहे. यंदा डिसेंबरपासूनच 258 बंगले आणि 7 हॉटेल-रिसोर्ट धारकांना परिमंडळ पाचच्या पोलीस विभागाने नोटीस बजावून येऊर-उपवन परिसरात गस्त वाढवली आहे.
३१ डिसेंबर या सरत्या २०१८ वर्षाला निरोपाची आणि १ जानेवारी या नव्या वर्षाच्या स्वागतानिमित्त शहरात जल्लोष साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर ठाणे आयुक्तालयाच्या ठाणे शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नाक्यानाक्यांवर वाहन तपासणीही केली जाणार आहे. ठाण्यातील तरूण मंडळी येऊर, उपवन, घोडबंदर मार्गावरील काही हॉटेलमध्ये पाटर्या करण्यासाठी जातात. अनेकदा मद्य प्राशन करुन वाहने चालवली जातात. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही मोठे असते. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस कडेकोट बंदोबस्त तैनात करणार आहे. तसेच ब्रीथ अॅनलायझरचाही या बंदोबस्तामध्ये वापर होणार असल्याचेही ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सांगितले आहे. तर महिलांची छेडछाड सारख्या प्रकारावर या दिवसात आळा बसण्यासाठी सिव्हिल वेशात स्पेशल लेडीस पोलीस टीम गस्त घालणार आहेत. वेळ पडलीस ड्रोणचा ही वापर करू असे ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी यावेळी सांगितले आहे.