त्यांनी ओला गाडी बुक केली, पण प्रवासासाठी नाही तर... ओला चालकाच्या हत्येने खळबळ

त्यांना नशेसाठी पैसे हवे होते, मग त्यांनी आखला भयंकर कट

Updated: May 31, 2022, 09:13 PM IST
त्यांनी ओला गाडी बुक केली, पण प्रवासासाठी नाही तर... ओला चालकाच्या हत्येने खळबळ title=

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : गांजा पिण्यासाठी अडीच हजार पाहिजे होते आणि त्यासाठी चक्क एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे.  ठाण्यातील दिवा परिसरातील खर्डी रोडवर हा प्रकार घडला आहे. हत्या झालेला तरुण हा ओला गाडीचा चालक होता. 

भाड्याने ओला गाडी बुक करून काही जणांनी दिवा इथं जाण्यासाठी गाडीत बसले. दिव्या जवळील खर्डी रोडवर लघुशंका करण्याच्या बहाण्याने गाडी थांबवत आरोपींनी ओला ड्रायव्हरला लुटण्याच्या प्रयत्न केला. त्याच्याकडून अडीच  हजार काढले. ओला ड्रायव्हरने त्याला विरोध केला असता  लुटारूंनी त्याच्या डोक्यात दगड आणि पेव्हरब्लॉक मारून त्याची हत्या केली.

ठाण्यातील शिळ डायघर पोलीसांना 29 मे रोजी सकाळी दिवा गावातील एका शेतकऱ्याने एका अज्ञात इसमाचा खून झाला असून त्याचं शव खर्डी रोडकडे जाणार्या कच्च्या रस्त्यावरील ब्रिज खाली अर्धनग्न परिस्थितीत पडला असल्याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच शिळ डायघर पोलीस घटना स्थळी पोहचले. 

पोलिसांनी पंचनामा केला असता मयत व्यक्तीच्या डोक्यात दगड आणि पेव्हरब्लॉक मारून त्याची हत्या केली असल्याचं निष्पन्न झालं. तसंच मृतदेहाजवळ एक ओला कंपनीची गाडी उभी असलेली पोलिसांना आढळून आली. तपासादरम्यान पोलिसांनी गाडीच्या नंबर वरून ओला कंपनी मार्फत मृताची ओळख पटवली. 

मयत ओला चालकाचे नाव मोहम्मद आली अन्सारी असून तो घाटकोपर मुंबई इथं राहणारा होता. पोलिसांनी  तांत्रिक यंत्रणाच्या मदतीने तपालासा सुरुवात केली. यानंतर अवघ्या 10 पोलिसांनी 5 आरोपींना गजाआड केलं. हसिरूल हालीम शेख 36, आतिश भोसले 21, ओंकार कासेकर 21 आणि प्रशांत पेरिय 19  अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. 

यात एका अल्पवयीन आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या 5 हि जणांना पोलिसांनी ठाणे न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने या आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपींनी बदलापूर इथून दिवा इथं जाण्यासाठी ओला गाडी बुक केली. गाडी दिवा नजदीक आल्यानंतर आरोपींनी गाडी खर्डीरोड जवळ लघुशंका करण्यासाठी थांबवली. नशा करण्यासाठी आरोपींना पैसे हवे होते म्हणून त्यांनी ओला चालकालाच मारहाण करण्यास सुरुवात केली. 
ओला चालकाच्या खिशातून आरोपींनी अडीच हजार रुपये आणि एक मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतला. ओला चालकाने प्रतिकार केला असता आरोपींनी त्याच्या डोक्यात दगड आणि पेव्हरब्लॉकने जोरदार प्रहार करून त्याची हत्या केली. फक्त नशा करण्यासाठी या आरोपींनी ओला चालकाची हत्या केल्याचं तपासात समोर आलं.