समृद्धी महामार्ग ‘देवेंद्रभरोसे’, माणसे मेली की शिंदे फक्त...; 'बाळासाहेबांचा आत्मा अश्रूंनी भिजला' म्हणत हल्लाबोल

Samruddhi Mahamarg Accidents: "दिल्लीपासून उत्तरेतला ‘यमुना एक्सप्रेस वे’ असेल नाही तर इतर महामार्ग, मग अपघातांचे प्रमाण आपल्याच समृद्धी महामार्गावर जास्त का? ‘एमएसआरडीसी’ कंपनीने हा मार्ग बांधला व हे खाते गेली अनेक वर्षे एकनाथ शिंदे सांभाळत आहेत," असाही उल्लेख करण्यात आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 4, 2023, 12:30 PM IST
समृद्धी महामार्ग ‘देवेंद्रभरोसे’, माणसे मेली की शिंदे फक्त...; 'बाळासाहेबांचा आत्मा अश्रूंनी भिजला' म्हणत हल्लाबोल title=
समुद्धी महामार्गावरील अपघात सत्रावरुन हल्लाबोल

Samruddhi Mahamarg Accidents: सिंदखेड राजा येथे विदर्भ ट्रॅव्हलर्सच्या खासगी बसच्या भीषण अपघातावरुन उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray Group) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न असून त्यांच्या पुढाकारानेच हा प्रकल्प राबवण्यात आला असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. तसेच विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास माणसाला कंत्राट देण्यात आलं त्याच भागात अपघात होत असल्याचा उल्लेखही ठाकरे गटाने केला आहे. या महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात आलं आहे. पण रस्त्यावरील हा आकांत पाहून बाळासाहेबांचा आत्माही अश्रूंनी भिजला असेल, असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे. तसेच सतत अपघात होणारा हा महामार्ग जणू ‘देवेंद्रभरोसे’ सोडून दिला आहे, असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.

महाराष्ट्रातील मृत्यूचे तांडव व पेटलेल्या चितांची दखल न घेता...

"महाराष्ट्रातला राजकीय गदारोळ संपलेला नाही, पण त्या गदारोळात समृद्धी महामार्गावर होरपळलेल्या जिवांचा आकांत आणि त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश विरून जाऊ नये. महाराष्ट्राच्या राजकारणास एक संस्कृती आणि परंपरा आहे. ते राजकारण इतके निर्दयी का झाले?" असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाने 'सामना'च्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे. "समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांच्या चिता जळत असताना मुंबईच्या राजभवनात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला. पेटलेल्या चिता व आक्रोशाची पर्वा न करता राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सुरू होता. एकमेकांना पेढे भरवले जात होते. फटाके फोडून गळाभेटी घेतल्या जात होत्या. महाराष्ट्रातील मृत्यूचे तांडव व पेटलेल्या चितांची दखल न घेता हे प्रकार महाराष्ट्रात सुरू आहेत. कालच्या राजकीय उलथापालथीत व उखाळ्या पाखाळ्यात समृद्धीवरील ‘हत्या’ विसरल्या जाऊ नयेत." असं या लेखात म्हटलं आहे.

सरकार स्वतःवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून घेणार का?

"बुलढाण्याजवळ याच महामार्गावर शनिवारी भीषण बस अपघात होऊन 25 जणांचा जळून कोळसा झाला. समृद्धी महामार्ग सुरू होऊन 203 दिवस झाले. या काळात 450 अपघात झाले व त्यात साधारण शंभरच्या आसपास लोकांना जीव गमवावे लागले आहेत. शनिवारीच समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघात झाला. त्यात एका चिमुरडीसह आई-वडिलांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशीही एक कार दुभाजकावर धडकून झालेल्या दुर्घटनेने आई-वडील आणि मुलगा यांचा बळी घेतला. या एकाच मार्गावर इतके अपघात का होत आहेत? इतके बळी का जात आहेत? सरकारने आता बस ड्रायव्हरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला, पण त्याच महामार्गावर छोट्या वाहनांचा अपघात होऊन आतापर्यंत कुटुंबेच्या कुटुंबे जागीच ठार झाली. या सर्व अपघातांबाबत शिंदे-फडणवीस सरकार स्वतःवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून घेणार आहे काय? शरद पवार यांनी मोजक्या शब्दांत या अपघातावर भाष्य केले आहे. ‘‘रस्त्यांचे शास्त्रीय नियोजन केले नाही, त्याचा दुष्परिणाम म्हणून हे अपघात होत आहेत.’’ पवार पुढे जे सांगतात तीच महाराष्ट्राची लोकभावना असावी. ते म्हणतात, ‘‘आमच्या गावात आता अशी चर्चा आहे की, समृद्धीवर एखाद्दुसरा अपघात झाला आणि त्यात कुणाचा मृत्यू झाला की लोक म्हणतात, या अपघातात एक ‘देवेंद्रवासी’ झाला. हा महामार्ग करण्याच्या काळात नियोजन आखण्यात ज्यांच्यावर जबाबदारी होती, त्यांना लोक दोषी ठरवतात.’’ हे खरेच आहे," असं म्हणत ठाकरे गटाने शरद पवारांच्या विधानाचं समर्थन केलं आहे.

उपाययोजना करणार म्हणजे नक्की काय करणार?

"समृद्धी महामार्ग हे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न होते. नागपूर मुंबईच्या जवळ आणावे. त्यातून विदर्भाचा विकास होईल, असे फडणवीस यांचे मत होते. त्यामुळे मुख्यमंत्री असताना व नंतरही फडणवीस यांनी त्यांची महत्त्वाकांक्षी योजना पुढे नेली. तोच समृद्धी महामार्ग आता रोज माणसे खात आहे. बकासुराप्रमाणे बळी घेत आहे. शनिवारच्या भीषण अपघातामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी मृतांना व जखमींना मदत जाहीर केली. ते लगोलग घटनास्थळी गेले. गेल्या पाच-सहा महिन्यांत किमान पन्नासेक वेळा तरी मुख्यमंत्र्यांवर या महामार्गावरील अपघातांच्या निमित्ताने शोक व्यक्त करण्याची वेळ आली, पण महामार्गावरील अपघातांची मालिका काही थांबलेली नाही. मुख्यमंत्री म्हणतात की, ‘अपघात मानवी चुकांमुळे होत आहेत व अपघात होऊ नये यासाठी राज्य सरकार उपाययोजना करील.’ आता उपाययोजना करणार म्हणजे नक्की काय करणार?" असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

हा महामार्ग जणू ‘देवेंद्रभरोसे’

"बुलढाण्याचा अपघात भयावह आहे. नागपूरहून निघालेली ही बस बुलढाण्यातील सिंदखेड राजा भागातील पिंपळखुंटा येथे पोहोचली व 1 वाजून 26 मिनिटांनी अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस लोखंडी खांबावर आदळली व डिव्हायडरला धडकून उलटली. बसची डिझेलची टाकी फुटली आणि बसने पेट घेतला. इतक्या मोठ्या महामार्गावर अपघात टाळण्यासाठी यंत्रणा नाही. अपघात झाल्यावर बचावासाठी मदत योजना नाही. एक महाकाय बस धडधड पेटत होती व आजूबाजूने जाणारी वाहनेही मदतीसाठी थांबली नाहीत. त्या आगीच्या लोळांत बसमधील प्रवाशांचा आक्रोश विरून गेला. अग्निशमन यंत्रणा नाही की रुग्णवाहिका नाही. सतत अपघात होणारा हा महामार्ग जणू ‘देवेंद्रभरोसे’ सोडून दिला आहे. माणसे मेली की, शिंदे फक्त मदतीचे चेक फाडतात. इतक्या संवेदनाहीन पद्धतीने कारभार सुरू आहे," अशा शब्दांमध्ये ठाकरे गटाने विद्यमान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

त्या कंपनीचा लंडननिवासी संचालक कोणाचा खास माणूस आहे?

"मुळात हा महामार्ग पहिल्यापासून वादात आहे. या महामार्गावर पहिल्यापासून ठेकेदारांचेच राज्य होते. शेतकऱ्यांच्या पिकत्या व बागायती जमिनी त्यांच्या मनाविरुद्ध सरकारने घेतल्या. एक-एक किलोमीटरमागे कोट्यवधीचे कमिशन खाण्याचे उद्योग झाले व त्याच उद्योगांतून पुढे सत्तांतर घडविण्यासाठी आमदार-खासदारांना भरभरून ‘खोके’ दिले गेले. हा महामार्ग एकप्रकारे शापित मार्ग बनला आहे व रोज निरपराध्यांचे बळी घेत सुटला आहे. या महामार्गास ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ असे नाव दिले, पण रस्त्यावरील हा आकांत पाहून बाळासाहेबांचा आत्माही अश्रूंनी भिजला असेल. समृद्धी महामार्गाच्या उभारणीत अनेक स्वप्नांचा चुराडा झाला व त्याच महामार्गावर अनेक जिवांचा त्यांच्या स्वप्नांसह मृत्यू होत आहे. ‘‘समृद्धी महामार्गाचे बांधकाम पूर्णपणे सुरक्षित आहे व त्याच्या बांधकामात कोणतीही अडचण नाही,’’ असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. मानवी चुका व वाहनांतील गडबड यामुळे अपघात होत आहेत असे बोलून सरकारने 25 मृतांच्या बाबतीत जबाबदारी झटकून टाकली. मात्र अशी जबाबदारी झटकून या महामार्गाच्या बांधकामाच्या दर्जाबाबत, त्यातील दोषांबाबत वेळोवेळी झालेल्या आरोपांचा ‘कोंबडा’ आरवायचा थांबेल, असे सरकारने समजू नये. या महामार्गावर ज्या वाशिम आणि बुलढाणा भागांत सर्वाधिक अपघात झाले तेथील रस्ते बांधणीचे कंत्राट ठाण्याच्या एका कंपनीकडे होते. ही कंपनी आणि त्याचा लंडननिवासी संचालक कोणाचा खास माणूस आहे? हा मार्ग सुरू होण्यापूर्वी त्यावर उभारलेल्या कमानी कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता. त्यावेळीही याच कंपनीच्या कामाच्या दर्जाविषयी प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या. त्याकडे काणाडोळा का करण्यात आला? आता याच भागांत वारंवार होणारे भीषण अपघात आणि त्यातील हकनाक बळी तेथील सदोष बांधणीकडेच बोट दाखवित आहेत. तरीही राज्यकर्ते त्यावर पांघरुण घालत आहेत. या  सरकारकडे मानवता आणि संवेदनशीलता नसल्याचा आणखी कोणता पुरावा हवा?" असा प्रश्न या लेखातून विचारण्यात आला आहे.

होरपळलेल्या प्रवाशांच्या किंकाळ्या यांना काय अस्वस्थ करणार?

"देशभरात असे अनेक महामार्ग गेल्या काही वर्षांत निर्माण झाले. दिल्लीपासून उत्तरेतला ‘यमुना एक्सप्रेस वे’ असेल नाही तर इतर महामार्ग, मग अपघातांचे प्रमाण आपल्याच समृद्धी महामार्गावर जास्त का? ‘एमएसआरडीसी’ कंपनीने हा मार्ग बांधला व हे खाते गेली अनेक वर्षे एकनाथ शिंदे सांभाळत आहेत. त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले, पण हे खाते त्यांनी स्वतःपाशीच ठेवले. कारण त्यात राज्याचे सगळ्यात मोठे अर्थकारण आहे. त्याच अर्थकारणातून समृद्धीवर बळी जात आहेत काय? महाराष्ट्रात एक संवेदनाहीन सरकार सत्तेवर आहे. दंगली घडवणे, भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणे, महिलांवरील अत्याचार उघडय़ा डोळ्यांनी पाहणे, अशा पद्धतीने कायदा-सुव्यवस्थेची होळी होत असताना समृद्धी महामार्गावरील पेटलेली बस आणि त्यातील होरपळलेल्या प्रवाशांच्या किंकाळ्या यांना काय अस्वस्थ करणार? तिकडे निरपराध्यांची प्रेते जळत होती व इकडे भाजप, मिंधे गट व अजित पवारांचा गट शपथविधी सोहळ्यात दंग होता. मुर्दाडांचे राज्य यालाच म्हणतात," अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.