मुंबई: अरबी समुद्रातील नियोजित शिवस्मारकाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करणाऱ्या ठाकरे सरकारला सोमवारी चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी नागपूरात घेतलेल्या पत्रकारपरिषदेत शिवस्मारक प्रकल्पातील गैरव्यवहाराची चौकशी केली जाईल, असे म्हटले होते. परंतु, सरकारला चौकशीच्या नावाखाली स्मारकाचे बांधकाम रेंगाळत ठेवायचे आहे, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला. एवढेच नव्हे तर सरकारला या प्रकल्पाची चौकशी करायची असेल तर ती रेंगाळत न ठेवता तातडीने करा, असे आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी सरकारला दिले.
भाजप सावरकरांच्या भूमिकेशी द्रोह करतेय- मुख्यमंत्री
अरबी समुद्रातील शिवस्मारक ही राज्यातील जनतेची अनेक वर्षांची इच्छा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला १५ वर्षांच्या काळात शिवस्मारकासाठी एकही परवानगी आणता आली नाही. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सर्व परवानग्या आणून कामाला सुरुवातही केली. हीच गोष्ट महाविकासआघाडीला खटकत आहे. आपल्याला १५ वर्षांमध्ये जमलं नाही ते आम्हाला पाच वर्ष जनतेला समजू नये, हा महाविकासआघाडी सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे चौकशी लावून शिवस्मारकाचा प्रकल्प रेंगाळत ठेवण्याचा सरकारचा डाव आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच शिवस्मारक प्रकल्पाचे १०० कोटींचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, अजूनही त्याचे पैसे अदा करण्यात आलेले नाहीत. मग आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप कसा काय होऊ शकतो, असा सवाल यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विचारला.
तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी कालच्या पत्रकारपरिषदेत आम्ही शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती देणार नाही, हे स्पष्ट केले होते. आमच्याकडे शिवस्मारकाच्या कामात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. महाराजांच्या स्मारकाच्या कामात घोटाळा हे निंदाजनक असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केले होते.