सागर आव्हाड, झी 24 तास, पुणे : एक दोन किंवा शेकडोंनी नव्हे तर तब्बल हजारोंच्या संख्येत पैसे घेऊन बोगस शिक्षक बनवणाऱ्या टोळीचा झी 24 तासने पर्दाफाश केला आहे. त्यामुळे तुमच्या मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. (tet exam scam big scam in maharashtra teacher eligibility test 7 thousand 800 failed students were passed with money)
राज्यातील सर्वात मोठा टीईटी घोटाळा झी 24 तासनं उघड केला. त्यानंतर या घोटाळ्याचा तपास सायबर पोलीस करत आहेत. पोलिसांच्या तपासासोबतच झी 24 तासची इन्व्हेस्टीगेशन टीम या घोटाळ्याचा अधिक शोध घेत आहेत. हा शोध घेत असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं 2018 आणि 2019 मध्ये टीईटी परीक्षा घेण्यात आली. या 2019-20च्या टीईटी परीक्षेत एकूण 16 हजार 592 परीक्षार्थी उत्तीर्ण झाल्याचा निकाल देण्यात आला. सायबर पोलिसांनी मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर झालेल्या निकालाची पडताळणी केली. त्यात 7 हजार 800 शिक्षक बोगस असल्याचं उघड झालं. घोटाळेबाजांनी प्रत्येकी 50 ते 60 हजार रुपयांना बोगस सर्टिफिकेट विकल्याचं समोर आलं.
या परीक्षार्थ्यांनी पैसे देऊन टीईटी पास झाल्याचं सर्टिफिकेट मिळवलं. यातले काही नोकरीवर रूजू झाले आहेत. तर काही रूजू होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तुमच्या मुलांना नापास शिक्षक शिकवतायेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, ओएमआर शिटमुळे बोगस विद्यार्थ्यांचं पितळ उघडं पडलं. मात्र हा घोटाळा 2019-20च्या परीक्षेपुरता मर्यादित नाही. 2013 पासूनच्या टीईटी प्रमाणपत्रांची तपासणी करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
तर, घोटाळेबाजांमुळे परीक्षा परिषदही खडबडून जागी झाली आहे. आता पैसे देऊन उत्तीर्ण झालेल्या 7 हजार 800 जणांवर कडक कारवाई करण्याचा इशारा परिषदेनं दिला आहे. जे शिक्षक सेवेत असतील त्यांच्यावरही कारवाई केली जाणारं आहे.
शिक्षण विभागाला लाज आणणाऱ्या या टीईटी घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, सल्लागार अभिषेक सावरीकरला अटक करण्यात आली आहे.
विद्येच्या मंदिरात भ्रष्टाचाररूपी रावण बोकाळल्यानं शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. तुमच्या मुलांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या बोगस शिक्षकांचा झी २४ तास तर पर्दाफाश करणारच. पण, तपास यंत्रणांनीही याच्या मुळाची जाऊन बड्या माशांचा बेड्या ठोकण्याची गरज आहे.