मालेगावात दोन दिवसात कार्यान्वित होणार टेली रेडिओलॉजी – आरोग्यमंत्री

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालेगाव शहरातील रुग्णालयात ‘टेलीरेडिओलॉजी’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

Updated: May 14, 2020, 08:21 AM IST
मालेगावात दोन दिवसात कार्यान्वित होणार टेली रेडिओलॉजी – आरोग्यमंत्री   title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोना विषाणूमुळे नाशिकमधील मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक बाधित झाले आहेत. तसेच आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, नर्स आणि अधिकारी तसेच पोलीस यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. मालेगाव हॉटस्पॉट शहर ठरले आहे. त्यामुळे येथे विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य सेवेला आता तंत्रज्ञानाची जोड देण्यात येणार आहे, त्यासाठी येत्या दोन दिवसात मालेगाव शहरातील रुग्णालयात ‘टेली रेडिओलॉजी’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

 मालेगाव शहरातील कोरोना विषाणूमुळे वाढती रुग्णसंख्या व वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बुधवारी आरोग्यमंत्री टोपे यांनी नाशिकला भेट दिली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. यावेळी आरोग्यमंत्री  टोपे यांनी विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे, महापौर ताहेरा शेख, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, विभागीय आयुक्त राजाराम माने, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ.आरती सिंग, माजी आमदार आसिफ शेख, माजी महापौर रशिद शेख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यामुळे योग्य उपचाराची दिशा ठरणार

टेलीरॅडियोलॉजी म्हणजे रेडिओलॉजिकल रुग्ण प्रतिमांचे एक्स-रे, सीटी आणि एमआरआय सारख्या रेडिओलॉजिकल आणि डॉक्टरांशी अभ्यास सामायिक करण्याच्या उद्देशाने एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी प्रसारित करणे. न्यूमोनियासह अन्य टेस्टिंगसाठी एक्स-रे महत्त्वाचा असून त्याचा रिपोर्ट हा टेलि रेडिओलॉजीच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांकडे जावून त्यावर योग्य उपचाराची दिशा ठरणार आहे. त्यामुळे रुग्णाला त्याचे निदान व आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात येणारे उपचार तत्काळ मिळणार आहेत. त्याचबरोबर नाशिकमध्ये ‘टेली मेडिसीनची’ व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांना आवश्यक उपचाराबाबत सल्ला व उपचाराची योग्य दिशा देणार आहेत. या माध्यमातून कोविड आणि नॉन कोविड अशा सर्व रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

कोविड सेंटर वाढविण्याची गरज

मालेगावमध्ये डेडिकेटेड कोविड सेंटर वाढविण्याची गरज लक्षात घेवून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. हज हाऊसमध्ये ऑक्सिजन लाईन घेण्यात आली असून एम.एस.जी. महाविद्यालयात सुसज्ज अशी आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात नवीन रुग्णालय वाढविण्यावर भर देण्यात येत असून त्यासाठी आवश्यक डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ आणि अन्य आवश्यक बाबी पुरविण्याचे काम करण्यात आले आहे.

आवश्यक सर्व सुविधा देण्याचे काम

कोविड-१९ च्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णांच्या लक्षणांचा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करुन मोठ्या संख्येने रुग्णांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. नॉन कोविड रुग्णालयासह कोविड रुग्णालयात आवश्यक सर्व सुविधा देण्याचे काम करण्यात आले आहे. त्याच बरोबर एक्स-रे मशिन व अत्यावश्यक साहित्य सामग्री पुरविण्यावर भर देण्यात येणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोना टेस्टिंग रिपोर्टसाठी  विलंब टळणार

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV) लॅबमधून दररोज ३०० टेस्टींग रिपोर्ट २४ तासात मिळणार आहेत, तसेच धुळ्यात नवीन ४५० प्रतिदिन अहवाल देणारी लॅब पूर्ण क्षमतेने येत्या दोन दिवसात सुरु होणार आहे. त्यामुळे मालेगावचे टेस्टिंग रिपोर्ट प्रलंबित राहण्याचा विषय आता मार्गी लागला असून रुग्णांचे निदान व उपचार वेळेत मिळणार असल्याचेही आरोग्यमंत्री यांनी सांगितले.

मोबाईल व्हॅन्स आरोग्य सेवा

खासगी रुग्णालये जरी सुरु झाले असले तरी, त्यात केवळ ओपीडी कार्यान्वित आहेत. आयपीडी अजून सुरु नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून नियमित अहवाल सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे. मोबाईल व्हॅन्सच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्यासाठी पुरेशा प्रमाणात डॉक्टर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी-कर्मचारी हजर होत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिले.