विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : वयात येणाऱ्या मुलींच्या शारीरिक आणि मानसिक समस्या मोठ्या पण त्या कुणापुढे मांडाव्या त्यावर उत्तर कसं शोधावं? असा प्रश्न प्रत्येक मुलीला असतो. मुलींचे पालकही या समस्येनं हैराण असतात. हीच समस्या सोडवण्यासाठी आणि या मुलींना बोलतं करण्यासाठी जळगावात 'रोटरी क्लब ऑफ ईस्ट'नं एक उपक्रम हाती घेतलाय.
किशोरवयीन मुलींना येणाऱ्या शारीरिक आणि मानसिक समस्या हा पालकांसाठी काळजीचा विषय असतो. वयात येणाऱ्या अशा मुलींच्या शारीरिक वाढीसाठी आरोग्यासंदर्भातल्या समस्यांची कोंडी फोडण्याचा प्रयत्न जळगावात 'रोटरी क्लब ऑफ ईस्ट'नं केलाय. शाळांमध्ये शौचालायांत 'बॉक्स ऑफ हेल्प' हा उपक्रम सुरू करण्यात आलाय. मुलींनी या बॉक्समध्ये समस्या लिहून कळवायच्या. या मुलींचं कॉन्सिलिंग करण्यासाठी महिला डॉक्टर्स आहेत. ज्या ज्या शाळा महाविद्यालयांमध्ये हे बॉक्स लावलेयत. ते दर महिन्याला उघडले जाणार आणि त्यातल्या समस्यांवर य़ा महिला डॉक्टर्स मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती या प्रकल्पाच्या प्रमुख सुधा काबरा यांनी दिलीय.
या उपक्रमामुळे मुलींना मोठा फायदा होणराय. शाळेत नेहमीच शेक्षणिक उपक्रम राबवले जातात. पण आरोग्यासाठीच्या या उपक्रमामुऴे मुलींना त्यांचं मन मोकळं करता येणार आहे. त्यामुळं मुलींनी आनंद व्यक्त केलाय. आजवर दहा शाळांमध्ये हा उपक्रम हाती घेण्यात आलाय. मुलींनी न लाजता या 'बॉक्स ऑफ हेल्प'मध्ये आपल्या समस्या लिहून कळवाव्यात, असं आवाहन केलं जातंय.