अश्लिल क्लिप दाखवून शिक्षकाचं विद्यार्थिनींशी विकृत वर्तन, महाराष्ट्रात चाललंय काय?

पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे. 

Updated: Feb 3, 2020, 08:07 PM IST
अश्लिल क्लिप दाखवून शिक्षकाचं विद्यार्थिनींशी विकृत वर्तन, महाराष्ट्रात चाललंय काय? title=

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील शंकर नगर इथल्या शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच नांदेड जिल्ह्यात अशीच एक दुसरी घटना उघडकीस आली आहे. शहरा लगत असलेल्या विमनातळ पोलीस स्टेशन हद्दीतील शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत विकृत वर्तन केल्याचं समोर आलं आहे. 

स्वप्नील शृंगारे हा या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असून विद्यार्थिनींना बोलवून मोबाईलवर अश्लील चित्रफीत दाखवून त्यांच्यासोबत अश्लील चाळे करत होता. जर हा प्रकार कुणाला सांगितला तर शाळेच्या इमारतीवरुन खाली फेकून देईल अशी धमकीही त्याने विद्यार्थिनींना दिली होती. 

याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली असून आज शाळा बंद ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षक स्वप्नील शृंगारे याला ताब्यात घेतलं आहे. 

दरम्यान, सोमवारी वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाटमध्ये एका शिक्षिकेला पेटवून देण्याचा धक्कादायक घडला. सोमवारी सकाळी साडे सात वाजता आरोपी विकेश नगराळे याने या शिक्षिकेला पेटवून दिलं. आरोपी घटनास्थळाहून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असून त्यातूनच तिला जाळण्याचा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे.

आरोपी विकेश नगराळे हा त्या शिक्षिकेच्या गावातलाच आहे. तो एका हातात पेट्रोलचा डबा आणि एका हातात जळती काठी घेऊन उभा होता. ती येताच त्याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकलं. त्यामध्ये ती ३० टक्क्यांवर जळाली. तिची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. त्या मुलीची दृष्टी आणि वाचाही जाऊ शकते. सध्या या तरुणीवर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरु असून तिची  मृत्यूशी झुंज सुरु आहे.