पुणे : पुण्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर दुपारी 12 वाजता पुणे विभागीय आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषेदत त्यांनी काही महत्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे. या पत्रकार परिषदेतून रूग्णांची ओळख उघड न करण्याची विनंती त्यांनी केली आहे. तसेच आम्ही या रूग्णांची योग्य ती काळजी घेण्याच काम सुरू केलं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
डॉक्टरांची सांगितल्याप्रमाणे, कोरोनाग्रस्त दाम्पत्याची ओळख स्पष्ट केली जाणार नाही. त्यांना आवश्यक ते उपचार दिले जात आहेत. महापालिकेची टीम यासाठी सज्ज असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. दोन्ही फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात दुबईला फिरायला गेले होते. 1 मार्चला दोघेही पुण्यात परतले. दुबईहून आल्यावर दोघांनाही लागण झाली आहे. (पुण्यातील कोरोनाग्रस्त दाम्पत्याचा असा झाला प्रवास)
या रूग्णांसोबत एकूण 40 प्रवाशी होते जे दुबईला गेले होते. त्यांची यादी मिळाली आहे. त्या यादीनुसार त्यांची देखील तपासणी केली जात आहे. तसेच दोघांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेतली जात आहेत. दोघांच्या कुटुंबातील 3 जणांचे नमुने NIV कडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर दोघांना मुंबईतून पुण्यात आणलेल्या टॅक्सी ड्रायव्हरला देखील ऍडमिट करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने 207 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. या दाम्पत्याला आयसोलेशन विभागात ठेवण्यात आले आहे. दाम्पत्यातील एकामध्ये कोरोनाची सौम्य लक्षण पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या व्यक्तीच्या शरिरातील तापमान कमी झाल्यामुळे त्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. आता दोन्ही रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.