चंद्रपूर : विदर्भातील चंद्रपूर जिल्हा सर्वाधिक वनक्षेत्राने वेढलेला आहे. याठिकाणी असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये-जा असते. पर्यटन स्थळ म्हणून हा प्रकल्प पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. या प्रकल्पाला भेट देणाऱ्या हौशी पर्यटकांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. जर तुम्हीसुद्धा या प्रकल्पाला भेट देणार असाल तर, तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण या प्रकल्पाला भेट दे्ण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा भेट देणार असाल तर, तुम्हाला निश्चित वेळेतच यावे लागणार आहे.
प्रकल्पाला भेट देण्यासाठी, सकाळी ६ ते दुपारी २ पर्यंत ही वेळ निश्चित केली आहे. यानंतर आल्यास पर्यटकांना दंड भरावा लागणार आहे. दंडाची रक्कम ही ५०० रुपये असणार आहे. वेळेची मर्यादा घालण्यामागे एक कारण सांगितले आहे. उशीरा आलेले पर्यटक हे जंगलसफारी करता यावी यासाठी वेगात गाडी चालवतात. यामुळे वेळेची मर्यादा घालण्यात आली आहे.
या प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांना प्रवेश शुल्क भरावे लागते. नुकतेच या प्रवेशशुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ करताना सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या स्थानिक सल्लागार समितीला देखील याची कल्पना न देता दरवाढीचा निर्णय परस्पर घेण्यात आला. या प्रकल्पातील निवडक क्षणचित्रे कॅप्चर करण्यासाठी पर्यटक सोबत कॅमेरा आणतात. पर्यटक कॅमेरा वापरणार असतील तर वेगळे शुल्क द्यावे लागते. कॅमेरा नसल्यास अनेक पर्यटक हे आपल्या मोबाईलने फोटो घेतात. यामुळे मोबाईल नेण्यासाठी देखील बंदी आहे. अनोळखी ठिकाणी मित्रमंडळींची चुकामुक होऊ नये यासाठी मोबाईलची मदत होते. पण मोबाईल सोबत नेण्यासाठी बंदी असल्याने येणाऱ्या पर्यटकांना मनस्तापाचा सामना करावा लागणार आहे.
या प्रकल्पामुळे येथे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मीती झाली आहे. अनेक पर्यटक हे आपल्या सोयीनुसार या प्रकल्पाला भेट देण्याचे आयोजन करतात. त्यानुसार ते हॉटेल बुकिंग करतात. परिणामी या सर्व निर्णयाचा फटका हा स्थानिक व्यावसायिकांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.