...म्हणून टी-१ वाघिणीला मारावे लागले; वन विभागाची पहिली प्रतिक्रिया

सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास या भागातून ये-जा करणाऱ्या लोकांना टी १ वाघीण दिसून आली. 

Updated: Nov 4, 2018, 11:56 AM IST
...म्हणून टी-१ वाघिणीला मारावे लागले; वन विभागाची पहिली प्रतिक्रिया title=

मुंबई: यवतमाळच्या पांढरकवडा परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टी १ वाघिणीला ठार मारल्यामुळे वन विभागावर टीकेची झोड उठली आहे. टी १ वाघिणीला जेरबंद करण्याचा प्रयत्न न करताच तिला गोळ्या घालण्यात आल्या. तसेच तिला मारताना अनेक नियमांचेही उल्लंघन करण्यात आले, असा वन्यप्रेमींचा आरोप आहे. 

या पार्श्वभूमीवर वन विभागकडून रविवारी पहिल्यांदा मौन सोडण्यात आले. वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, हा प्रयत्न फसला आणि वाघिणीने गस्ती पथकावर हल्ला चढवला. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ वाघिणीवर गोळी झाडावी लागली, असे स्पष्टीकरण वनखात्याने दिले आहे. 

वन विभागाने पुढे म्हटले आहे की, गस्त करणाऱ्या वन विभागाच्या चमूमध्ये तीन वनकर्मचारी, अजगर अली हे निपूण नेमबाज वाहनचालकासह उघड्या जिप्सीमध्ये नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. शेतकऱ्यांच्या संरक्षणार्थ वनविभागाचे गस्ती पथक नित्य नियमाप्रमाणे शेतातील व वनातील लहानसहान रस्त्यांवर गस्त घालत होते.

या कामात वनकर्मचाऱ्यांव्यतिरिक्त स्थानिक लोकांना अतिरिक्त स्वरूपात रोजंदारीवर नियुक्त करण्यात आले. त्यांच्या मदतीने गुराख्यांना त्यांच्यासंरक्षणाकरिता तसेच संध्याकाळी उशीरापर्यंत शेतात कामे करणाऱ्या शेतकऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम देखील वनविभागाच्या चमूने प्रभाविपणे राबविले. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून मनुष्यहानी टाळण्यात यश आाले आहे.

राळेगांव येथे शुक्रवार आठवडी बाजाराचा दिवस असल्याने बोराटी - वरुड - राळेगांव रोडवर मोठ्याप्रमाणात स्थानिक नागरिकांची व वाहनांची वर्दळ होती. सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास या भागातून ये-जा करणाऱ्या लोकांना टी १ वाघीण दिसून आली. संबंधित लोकांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून या भागात वाघीणीचे अस्तित्त्व असल्याची माहिती दिली. यावर बचावात्मक उपाय म्हणून गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला.

त्याचबरोबर गस्ती पथकाने एका ठिकाणी गस्ती वाहन उभे करुन ये-जा करणाऱ्या लोकांना सुरक्षितपणे मार्गक्रमण करुन धोक्याच्या क्षेत्राबाहेर काढले. सदर गस्ती पथकालादेखील गस्ती दरम्यान वाघीणीची वारंवार हालचाल निदर्शनास आली. 

ही वाघीण नरभक्षक असल्याची खात्री झाल्यानंतर गस्तीपथकातील श्री. शेख यांनी वाघिणीला ट्रॅन्क्युलायझिंग गनचा वापर करुन बेशुध्द करायचा प्रयत्न केला. परंतु, वाघीण बेशुध्द झाली नाही व वाघीणीने मागे वळून उघड्या जिप्सीमध्ये असलेल्या गस्ती पथकावर प्राणघातक हल्ला करावयाचा प्रयत्न केला. या तीव्र प्राणघातक हल्ल्याची प्रतिक्रिया म्हणून गस्ती पथकातील शार्प शुटर श्री. अजगर यांनी ८-१० मीटरचे अंतरावरुन स्वरक्षणार्थ मारलेल्या गोळीने वाघीण ठार झाली असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.