पुणे : पिढीजात व्यवसाय बऱ्याचदा कुटुंबातील मुलांकडे सोपवला जातो. मात्र, पुण्यातील श्रीपद शंकर नगरकर ज्वेलर्स नावारुपास आलं या कुटुंबातील महिलांच्या कष्टामुळे आहे. आज नगरकर कुटुंबियांची तिसरी पिढी हा व्यवसाय करत आहे. मात्र, यामध्ये ठसा उमटवलाय तो नगरकर मायलेकींनी... नवदुर्गामध्ये पाहुयात गृहिणी ते व्यावसायिक असा प्रवास केलेल्या स्वाती नगरकर आणि त्यांच्या मुलीची ही सक्सेस स्टोरी...
सोन्याचे दागिने हा महिलांचा शतकानुशतकं जिव्हाळ्याचा विषय... सोन्याच्या दागिन्यांचे प्रकार, त्याची किंमत, किती तोळ्याचे दागिने करायचे या सगळ्यात घरातला महिला वर्ग आघाडीवर असतो... पण सोन्याचे दागिने घडवणारी किंवा सोन्याची पिढी सांभाळणारी महिला सापडणं फारच दुर्मिळ... पुण्यातल्या स्वाती नगरकर या त्यापैंकीच एक... सराफ व्यावसायिक म्हणून स्वाती नगरकर यांचं नाव पुण्यात प्रसिद्ध आहे... स्वतःच्या हिंमतीवर आणि मेहनतीवर स्वाती नगरकरांनी या व्यवसायात जम बसवलाय... सोन्या चांदींच्या दागिन्यांची पेढी गेली बारा वर्षं त्या समर्थपणे सांभाळतायत...
१९५२ साली श्रीपाद नगरकर यांनी पुण्यात सोन्या चांदीचा व्यवसाय सुरु केला... श्रीपद शंकर नगरकर ज्वेलर्स नावारुपाला येत असतानाच स्वाती यांचे पती वल्लभ नगरकर यांचा आकस्मिक मृत्यू झाला आणि व्यवसायाची जबाबदारी स्वाती नगरकर यांच्या खांद्यावर आली... पतीच्या निधनानं स्वाती खचून गेल्या होत्या... पण व्यवसायाचा हा सगळा डोलारा सांभाळण्यासाठी त्या हिंमतीनं आणि ताकदीनं उभ्या राहिल्या. स्वाती नगरकर या तोपर्यंत गृहिणी होत्या. त्यांची दागिन्यांशी जवळिक असली तरी सोन्या चांदीच्या व्यवसायाबद्दल त्यांना काहीच माहीत नव्हतं. पण तरीही स्वाती नगरकर यांनी हे आव्हान स्वीकारलं. पदरात तीन मुलं असतानाही त्या सोन्या-चांदीची पेढी सांभाळण्यासाठी नेटानं उभ्या राहिल्या. आज सराफपेढीतल्या प्रसिद्ध महिला व्यवसायिक म्हणून त्या आत्मविश्वासानं आणि अभिमानानं वावरतायत.
सोन्या-चांदीच्या या व्यवसायात जम बसवत असतानाच अनेक आव्हानांना त्यांना सामोर जावं लागलं. अनेकांच्या मदतीनं त्यांनी या व्यवसायातले बारकावे समजून घेतले. सोन्या चांदीच्या दागिन्यांचा ट्रेण्ड सतत बदलत असतो. त्यामुळे ग्राहकांना सतत उत्तमातली उत्तम डिझाईन्स देणं याकडेही स्वाती यांनी पुरेपूर लक्ष दिलं आणि काळानुसार दागिन्यांमध्ये त्या बदल घडवत गेल्या... काही काळानंतर त्यांनी हिऱ्यांच्या दागिन्यांचा व्यवसायही सुरू केला. त्यांच्याकडचे हिऱ्यांचे दागिने विशेष प्रसिद्ध आहेत. सोन्या-चांदीच्या दागिन्यांमध्ये पारंपरिकता जपण्यासोबतच इटालियन ज्वेलरी, अॅंटिक ज्वेलरी, हाँगकाँग ज्वेलरी यासारखे दागिन्यांचे अनेक प्रकार त्यांनी सुरु केले. प्रत्येक दागिना हा युनिक पीस असावा असा त्यांचा आग्रह असतो. त्याशिवाय दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकासोबत प्रत्यक्ष संवाद ठेवण्यावरही त्यांचा कटाक्ष असतो. त्यामुळेच ग्राहकांचा त्यांच्यावर विश्वास असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
पिढीजात व्यवसाय म्हटल्यावर बऱ्याचदा तो कुटुंबातील मुलाकडे सोपवला जातो... स्वाती नगरकर यांचा हा व्यवसाय सांभाळण्यासाठी त्यांच्या दोघी मुलींनी पुढाकार घेतलाय. मोठी मुलगी प्रियांकाला पायलट व्हायचं होतं. पण वडिलांच्या निधनानंतर तिनंही आईला या सराफा व्यवसायात मदत करायला सुरुवात केली. घरातूनच या व्यवसायाचं बाळकडू तिला मिळालं होतं. दागिन्यांच्या डिझाईन्सवर विशेष लक्ष देत प्रियांकानं या व्यवसायात मोठी भरारी घेतलीय. अॅंटिक ज्वेलरीमध्ये प्रियांकाचा हातखंडा आहे. पारंपरिक आणि वेस्टर्न डिझाईन्सचं कॉम्बिनेशन करत दागिने घडवायला तिला आवडतात. तिनं स्वतःचा गेहना बाय प्रियंका हा दागिन्यांचा ब्रॅंडही तयार केलाय. त्यामध्ये प्रत्येक दागिना वेगळा बनविण्याचा तिचा प्रयत्न असतो. मात्र, स्वत:च्या व्यवसायाबरोबरच वडिलांचा परंपरागत व्यवसाय पुढे नेण्यात प्रियांकाला समाधान वाटतं.
गेल्या बारा वर्षामध्ये स्वाती नगरकर आणि त्यांच्या मुलींच्या मेहनतीच्या जोरावर पुण्यात नगरकरांची सोन्या-चांदीची दोन दालनं सुरु झालीत. स्वाती नगरकर यांची तिन्हीही मुलं हा व्यवसाय पुढे नेतात. चांदीच्या दालनाची पूर्ण जबाबदारी मोठी मुलगी प्रीती तर सोन्याच्या व्यवसायामध्ये मुलगा पुष्कर स्वाती नगरकरांना मदत करतोय. इथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाकडे वैयक्तिक रित्या लक्ष पुरविण्याचा आपल्या आईचा कटाक्ष आजही ही पिढी पाळतेय. हा व्यवसाय पुढे् नेण्याच्या महत्त्वकांक्षेसोबतच आपल्याला या व्यावसायात आणण्याचं श्रेय मुलं आईलाच देतायत.
बाजारात सतत बदलणारे ट्रेंडस् आणि ग्राहकांची आवड लक्षात घेऊऩ सतत नवनवीन कलेक्शन सादर करणं ही सराफा व्यावसायिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं... मात्र, कल्पकतेबरोबरच या सराफा पेढीसाठी लागणारी प्रचंड गुंतवणूक यामुळे सोन्याचा व्यवसाय तसा जोखमीचाच... मात्र ही जोखीम स्वाती नगरकर यांनी लीलया पेललीय. या जोखमीच्या व्यवसायात नगरकर मायलेकी जिद्दीनं पाय रोवून उभ्य़ा आहेत. लक्ष्मी हे देवीचं एक रुप... सणासुदीला लक्ष्मीची पूजा केली जाते... बऱ्याचदा लक्ष्मी म्हणून सोन्या-चांदीच्या दागिन्यांचीच पूजा करण्याची पद्धत आहे. सोन्या-चांदीचा प्रचंड जोखमीचा आणि जबाबदारीचा व्यवसाय हिमतीनं सांभाळणाऱ्या या मायलेकींना सलाम