लातूर : जिल्ह्यातील औसा तालुक्यातील टाका गावच्या आठ तरुणांनी तहसील कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित पोलिसांनी आंदोलकांना मज्जाव केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यानंतर हे आंदोलक मराठा आरक्षणाची मागणी करीत औसा तहसील कार्यालयात प्रचंड घोषणाबाजी करत घुसले.
या आंदोलकांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्याना याबाबतचे निवेदनही देण्यात आले होते. मात्र राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय अद्यापही न घेतल्याने टाका गावच्या तरुणांनी आत्मदहनाचा निश्चय केला. आठ मराठा आंदोलकानी अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
यावेळी आंदोलकाना उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार अहिल्या गाठाळ तसेच डीवायएसपी गणेश किंद्रे यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर ही बराच वेळ आंदोलकांनी तहसील कार्यालयातच ठिय्या आंदोलन केलं. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याने आक्रमक आंदोलकानी तहसीलदार यांच्या दालनातील ठिय्या आंदोलन मागे घेतले.