औरंगाबाद : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. औरंगाबादमधल्या एका कार्यक्रमात बोलताना रावसाहेब दानवे यांनी अजब वक्तव्य केलं. इंधनाचे दर हे अमेरिकेत ठरतात, त्यामुळे केंद्र सरकारला वाढत्या इंधन दरासाठी दोषी ठरवणं चुकीचं आहे, असं अजब विधान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेनी केलं आहे.
औरंगाबादमधील भाजपच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी हे विधान केलंय. केंद्र सरकारने याच महिन्याच्या सुरुवातीला इंधनावरील कर कमी केल्याची आठवण दानवे यांनी करुन दिली. मात्र, त्याचवेळी भाजपाची सत्ता नसणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्यांनी व्हॅट कमी करुन सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा दिलेला नाही, असंही दानवे यांनी सांगितलं..
इंधन दरवाढीवरुन विरोधकांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं असून आंदोलनं केली जात आहेत. यावर बोलताना दानवे यांनी इंधन दरवाढीसाठी केंद्र सरकारला लक्ष्य करणं चुकीचं आहे असं म्हटलं आहे. इंधनाचे दर जागतिक बाजारातील परिस्थितीवर अवलंबून असतात. एखाद्या दिवशी दर वधारतो तर दुसऱ्या दिवशी खाली येतो, या किंमती अमेरिकेमध्ये ठरवल्या जातात, असं दानवे यांनी म्हटलं आहे.