डोंबिवलीतील विघ्नहर्त्यावर प्रदूषणाचं विघ्न, मूर्ती काळवंडली

दावडीच्या राजाची मूर्ती आणि प्रत्यक्ष पूजेची छोटी मूर्ती या दोन्ही मूर्ती काळ्या पडल्या

Updated: Sep 19, 2018, 03:31 PM IST
डोंबिवलीतील विघ्नहर्त्यावर प्रदूषणाचं विघ्न, मूर्ती काळवंडली title=

आतीश भोईर, झी मीडिया, डोंबिवली : डोंबिवलीत रासायनिक कंपन्यातून होत असलेल्या प्रदूषणामुळे नागरिक हैराण आणि बेजार आहेत. आता या प्रदूषणाचा फटका चक्क गणरायालाही बसलाय. दावडीच्या राजाची मूर्ती गेल्या पाच दिवसांपासून काळी पडत आहे. या प्रकारामुळं मंडळाचे कार्यकर्ते चक्रावून गेलेत.  

रासायनिक कंपन्यांचं प्रदूषण ही डोंबिवलीकरांच्या पाचवीला पूजलेली समस्या... या प्रदूषणामुळे तीन वर्षांपूर्वी डोंबिवलीत चक्क हिरव्या रंगाचा पाऊसही पडला होता. आता प्रदूषणाचा फटका गणरायाला बसलाय. दावडी गावातल्या दावडीचा राजा या गणेशाची मूर्ती प्रदूषणामुळे काळी पडत असल्याचं दिसून येतंय. पहिल्या दिवसापासून मूर्ती काळी पडायला लागली. दावडीच्या राजाची मूर्ती आणि प्रत्यक्ष पूजेची छोटी मूर्ती या दोन्ही मूर्ती काळ्या पडल्या. मूर्तीला पुन्हा रंग दिला पण काही उपयोग झाला नाही. 

डोंबिवलीच्या प्रदूषणामुळे डोंबिवलीत सातत्याने नागरिक आजारी पडतात. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबत वारंवार तक्रारी करूनही काही फायदा झालेली नाही.

प्रदूषणामुळे मूर्ती काळी पडण्याचा प्रकार डोंबिवलीत पहिल्यांदाच उघड झालाय.  प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची बुद्धी बाप्पाने अधिकाऱ्यांना द्यावी, ही यानिमित्ताने अपेक्षा...