जळगाव स्टेट बँक दरोड्याची २४ तासांत उकल, पीएसआयनेच वडिलांसोबत रचला होता डाव

State Bank Of India Robbery Case Update:स्टेट बँक दरोडा प्रकरणाचा पोलिसांनी 24 तासात लावला छडा, दरोड्यातील आरोपींना केली अटक गंभीर बाब म्हणजे यात कर्मचाऱ्यांचा देखील समावेश असल्याची पोलिसांची माहिती

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 4, 2023, 12:18 PM IST
जळगाव स्टेट बँक दरोड्याची २४ तासांत उकल, पीएसआयनेच वडिलांसोबत रचला होता डाव title=
State Bank Of India Robbery Case solved in 24 hrs psi arrested

State Bank Of India Robbery Case: जळगाव (Jalgaon) शहरातील कोल्हे शाळेजवळ असलेल्या स्टेट बँक शाखेत (State Bank Of India) दोन दिवसांपूर्वी पडलेल्या दरोड्याची उकल जिल्हा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत केली आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे एका पीएसआयनेच (PSI) आपले वडिल आणि मेहुण्याच्या मदतीने हा कट रचल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी (Police) तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

चाकूचा धाक दाखवत बँकेवर दरोडा

कालिका माता मंदिर परिसरात असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेवर गुरुवारी सकाळी ९.२० वाजेच्या सुमारास दरोडा पडल्याने जळगाव हादरले होते. दोन्ही दरोडेखोरांनी मॅनेजरला चाकूचा धाक दाखवून लॉकर उघडवून घेतले. लॉकरमध्ये ठेवलेली ३ कोटी ६० लाख रूपयांचे व १७ लाख रूपयांची रोकड असा एकुण ३ कोटी ७७ लाख रूपयांचा ऐवज आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर चोरून नेला. दोन्ही दरोडेखोर येतांना पायी डोक्यात हेल्मेट घालून आले होते. त्यानंतर बँक मॅनेजरचीच दुचाकी घेवून पसार झाले होते. 

२४ तासांत दरोड्याचा उलगडा

स्टेट बँकेत दरोडा पडल्याचे कळताच शहरात एकच खळबळ माजली होती. पोलिसांनी लगेचच सूत्रे हातात घेऊन तपास सुरू केला होता. यात गंभीर बाब म्हणजे यात एक पोलीस निरिक्षकाचा समावेश असल्याचे समोर आले आहे. जळगाव पोलीस पथकाने शंकर जासक याच्या मिळालेल्या पत्त्यावर शोध घेवून त्यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता, तो पोलीस उप निरीक्षक पदावर रायगड जिल्ह्यात नेमणुकीस असून ऑक्टोबर २०२१ पासुन कर्तव्यावर गैरहजर असल्याचे समजुन आले आहे. 

मेहुण्यासोबत संगनमत करत आखला कट

जासक याचा मेहूणा मनोज सुर्यवंशी हा स्टेट बँक ऑफ इंडीया कालका माता जळगाव येथे ऑफिस बॉय म्हणून करार पध्दतीने नोकरीस आहे. जासक याने त्याच्या सोबत संगनमत करून शंकर रमेश जासक आणि त्याचे वडील रमेश राजाराम जासक व मेहूणा मनोज रमेश सुर्यवंशी या तिघांनी बँकेत दरोडा टाकला. 

पोलिसांकडून तिघांना अटक

पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्याने बँकेतून नेलेले सोने व रोकड देखील काढून दिली आहे. पथकाने शंकर जासक याच्याकडून चोरीतील ३ कोटी ६० लाखांचे सोने आणि १६ लाख ४० हजारांची रोकड हस्तगत केली आहे.