मुंबई : ST employees aggressive : ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर (ST employees strike) जाण्याची शक्यता आहे. तसा इशारा देण्यात आला आहे. प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. सरकारला इशारा देण्यासाठी 27 ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. वेतन, रखडलेली देणी आणि एसटीचे विलिनीकरण या तीन मुद्यांवर महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास हिवाळी अधिवशेनावेळी एसटी कर्मचाऱ्याचा मोर्चा काढण्याचा इशाराही एसटी कर्मचारी संघटनेनं दिला आहे. (ST employees aggressive, ST workers likely to go on strike on the eve of Diwali)
पगार वेळेत मिळावा, रखडलेली देणी लवकरात लवकर मिळावी तसेच एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागण्यांसाठी एटी कर्मचारी ठाम आहेत. या मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा एसटी कर्मचारी संघटनांचा संपावर जातील, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटना अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली. या आंदोलनाचा पहिला भाग म्हणून 27 ऑक्टोबरला एसटी कर्मचारी राज्यभर बेमुदत उपोषण करणार आहेत.
हिवाळी अधिवेशनात नागपूर इथे एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी मोर्चा काढला जाणार आहे. आणि त्यानंतर ही मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तसेच मान्यताप्राप्त संघटनेच्या राज्य कार्यकारीणीमध्ये एसटीच्या विलीनीकरणासाठी एसटी कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असे संदीप शिंदे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आर्थिक अडचणीमुळे एसटी कर्मचारी आत्महत्या करत असल्याने संदीप शिंदे यांनी चिंता व्यक्त केली. कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबत नसल्याचे दिसत आहे. याचाही सरकारने गांर्भीयाने विचार करावा, अशी मागणी केली. दरम्यान, पंढरपूरमधील एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत 25 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. आणखी किती आत्महत्येचा विचार सरकार करणार, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही, महागाई भत्ता मिळत नाही, घर भाडे मिळत नाही. कोरोना काळात एसटी कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून काम केले. कोरोना काळात 306 एसटी कर्मचारी दगावले. एसटी कर्मचारी संघटना आता शांत बसणार नाहीत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.