....म्हणून 'या' गावात इमारत, तळघर नाही

तब्बल ९० टक्के ग्रामस्थांची बोलीभाषा ... 

Updated: Jul 16, 2020, 04:07 PM IST
....म्हणून 'या' गावात इमारत, तळघर नाही title=

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : गाव म्हटलं की, एके साचेबद्ध प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. पण, याच गावाची परिभाषा आणि त्या परिभाषेमागं असणारी एका गावाची कहाणी, तिथे रुजलेली परंपरा सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहे. ज्याप्रमाणं प्रत्येक गावाची आपली अशी एक प्रथा, परंपरा असते, तशीच या गावाचीही एक परंपरा. हे गाव आहे, खटाव. 

महाराष्ट्रल कर्नाटक सीमेवरील मिरज तालुक्यातील सुमारे सहा हजार लोकवस्ती असणारं हे गाव. या गावात तब्बल ९० टक्के ग्रामस्थांची बोलीभाषा कन्नड. मागील शतकभरापासून म्हणजेच जवळपास शंभर वर्षांपासून या गावात कोणीही इमारतीचं घर बांधलेलं नाही. इतकंच नव्हे, तर कोणी आपल्या घरात तळघरही तयार केलेलं नाही. 

असं करण्यामागचं कारण म्हणजे गावातील सोमेश्वरावर असणारी गावकऱ्यांची गाढ श्रद्धा. या सोमेश्वराच्या मंदिरास तळघर असल्यामुळं गावातील कोणीही आपल्या घराता तळघर करत नाही. मंदिराच्या कळसाच्या उंचीपेक्षा जास्त उंची असणाऱ्या इमारतीचं घर बांधल्यास नुकसान होतं अशी येथील गावकऱ्यांची भाबडी श्रद्धा आहे. 

मुख्य म्हणजे काही मोठमोठ्या वाड्यांचे भग्न अवशेषही या गावात आढळतात. असं म्हटलं जातं की काही सधन शेतकऱ्यांनी गावात दुमजली इमारत बांधण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यांचं नुकसान झाल्यामुळं हा नाद अर्धवटच सोडावा लागला होता. गावातील जुने जाणते गावकरीही ही माहिती देतात. 

सध्याच्या आधुनिकतेकडे झुकणाऱ्या युगातही या गावातील परंपरा मात्र बदललेली नाही. महाराष्ट्रानं कायम पुरोगामी वारसा जपला खरा, पण खटावसारख्या गावात श्रद्धेपायी अजूनही कोणी इमारत बांधण्याचं धाडस करत नाही.