जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : इयत्ता दुसरीच्या गणितातील पुस्तकात संख्यावाचनाविषयी नवीन प्रक्रिया सुचवण्यात आली आहे. झी २४ तासने सर्वप्रथम हा विषय समोर आणल्यावर या नव्या प्रक्रियेवर राज्यातील सर्वच स्तरातून प्रतिक्रिया आल्या. भाषातज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, साहित्यिक अशा अनेकांनी संख्यावाचनाच्या या नव्या पद्धतीला विरोध दर्शवला. संख्यावाचनाची ही पद्धती म्हणजे मराठी भाषेवर अन्याय करणारी आणि मराठी भाषेचे इंग्रजीकरण करण्याच्या प्रयत्न असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले.
मराठी संख्यावाचनाच्या या विषयावर राज्य विधिमंडळातही याचे पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह विरोधकांनी शिक्षण विभागाच्या या निर्णयावर आक्षेप घेतल्यावर खुद्द मुख्यमंत्र्यांना सभागृहात संख्यावाचनाच्या या पद्धतीवर समिती नेमण्याचे आश्वासन दिले. राज्यभरात गाजत असलेला संख्यावाचनाच्या या विषयाची सोशल मीडियावरही चर्चा होत आहे.
शिक्षण विभागाचा या निर्णयावर समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात सध्या जोक्स फिरायला लागले आहेत. जर संख्यावाचन याच पद्धतीने करण्यात आले तर नाते संबंधात जोडाक्षरांचा वापर न केल्यास काय होईल तर मुख्यमंत्री यांचा आडनावाचा कसा उच्चार केला जाईल असे हे जोक्स आहेत. एकूणच समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या संदेशनाच्या माध्यमातून संख्यावाचनाच्या पद्धतीवर जोरदार टीका करण्यात येत आहे.
जोड अक्षरामुळे मराठीची परिस्थिती फार कठीण होत असल्यामुळे मुळाक्षरे मुळातूनच बदलून टाकू म्हणजे तंत्रशिक्षणच खूप सोपं होईल आणि मराठीला जोडअक्षराच्या बेड्यातून मुक्त होऊन सोन्याचे दिवस येतील. असं शिक्षण विभागाला वाटत असलं तरी यामुळे मोठा गोंधळ उडणार आहे.