'आत्ताच सावकार व्हा! प्रचारासाठी मुले भाड्याने मिळतील'

सांगली शहरातील हरिपूर रोडवरच्या चौकात हा फलक लावण्यात आला आहे.

Updated: Jul 4, 2018, 09:10 AM IST
'आत्ताच सावकार व्हा! प्रचारासाठी मुले भाड्याने मिळतील' title=

सांगली: सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता वाढू लागली आहे. अशातच प्रचारासाठी मुलं भाड्याने मिळतील या भर चौकात लावण्यात आलेल्या फलकाने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. सांगली मिरज कुपवड महापालिका निवडणूक प्रचारसाठी १ हजार रुपये हजेरीने मुलं भाड्याने मिळतील. खालील नंबरवर संपर्क साधा आणि आत्ताच सावकार व्हा अशा आशयाचा हा फलक आहे. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. सांगली शहरातील हरिपूर रोडवरच्या चौकात हा फलक लावण्यात आला आहे.

सांगलीत महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसकडे एकूण २४०, राष्ट्रवादीकडे २९८ तर भाजपाकडे ३४० इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मूलखती सुरू झाल्या आहेत. तिन्ही पक्षाकडून सांगली आणि मिरज शहरात मुलाखती घेतल्या जात आहेत. सर्व उमेदवार घोषणाबाजी आणि शक्तिप्रदर्शन करत मुलाखतीसाठी येत आहेत. राष्ट्रवादीचा एका उमेदवार तर बैलगाडयातून मोठ्या मिरवणुकीत मुलाखतीसाठी आला होता.

इच्छुकांचे शक्तीप्रदर्शन

दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी शक्तिप्रदर्शनही करण्यास सुरूवात केली आहे. शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून आपण नेतृत्वाच्या नजरेत यावे हा उद्देश असला तरी, नेतृत्वावर अप्रत्यक्षरित्या दबाव टाकण्याचाही प्रयत्न उमेदवारांकडून होताना दिसत आहे. दरम्यान, उमेदवारीसाठी अनेकजण इच्छूक असले तरी, तिकीटत एकालाच द्य़ावे लागते. अशा वेळी पक्ष कोणाच्या पारड्यात तिकीटाचे दान टाकतो, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.