अशी चोरी फक्त पुण्यातच होऊ शकते...!

बातमी आहे पुण्यातून आणि तीही एका स्मार्ट चोराची...

Updated: Apr 1, 2018, 11:39 PM IST
अशी चोरी फक्त पुण्यातच होऊ शकते...! title=

पुणे : बातमी आहे पुण्यातून आणि तीही एका स्मार्ट चोराची.....कारण या चोराने चोरी केलेल्या पर्स मधील लायसेन्स चक्क कुरिअर करुन संबधीत महिलेला पाठवून दिलं. व्यवसायिक असलेल्या पुण्यातील सपना डे १७ मार्च रोजी सायंकाळी रेस कोर्स इथे वॉक घ्यायला गेल्या होत्या.

रेस कोर्स परिसरातच त्यांनी आपली कार पार्क केली होती. फिरुन परत आल्यावर त्या आपल्या कारकडे परतल्या तेव्हा गाडीच्या मागील बाजूची काच फोडून चोराने सिटवरची आपली बॅग चोरल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या बॅगेत रोख रक्कम, घराच्या, दुकानाच्या चाव्या आणि ड्रायव्हिंग लायसन्सही होतं.

चोर सापडला तरी लायसेन्स परत मिळण्याची मात्र त्यांना काडीमात्र अपेक्षा नव्हती त्यामुळे नवीन लायसेन्स काढण्याची प्रक्रियाही त्यांनी सुरु केली. मात्र  २८ मार्चला त्या राहत असलेल्या पुर्वीच्या घरी त्यांच्या नावाने एक पार्सल आले. सपना यांनी ते पार्सल उघडले आणि त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. कारण ज्या चोरट्याने  त्यांची बॅग चोरली होती त्याने चक्क त्यांचं लायसन्स कुरिअरने पाठवलं होतं. त्यामुळे अशी चोरी केवळ पुण्यातच होऊ शकते अशी चर्चा रंगलीय.