Chatrapati Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्गमधील (Sindhudurga) राजकोट किल्ल्यावरचा (Rajkot Fort) शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी 2 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. मेसर्स अर्टिस्टरी कंपनीचे मालक जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंटचे चेतन पाटील यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आलेत. बांधकाम विभागानं ही कारवाई केलीय. तर या प्रकरणात PWD ने नौदलाकडे (Indian Navy) बोट दाखवलंय. संभाव्य धोक्यासंदर्भात नौदलाला आधीच सुचना केल्याचं बांधकाम विभागाने स्पष्ट केलंय..
बांधकाम विभागाचं स्पष्टीकरण
4 डिसेंबर 2023 ला नौसेना दिनानिमित्त मालवण तालुक्यातील राजकोट किल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. जून महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शिल्पकार आपटे यांच्याकडून डागडुजी करण्यात आली होती. परंतु सद्यस्थितीत पुतळ्याचं जॉईट करण्यासाठी आपण नट बोल्टचा वापर केला होता. त्या नट बोल्टला आता पावसामुळे आणि खाऱ्या वाऱ्यामुळे गंज चढलाय. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विद्रूप दिसत आहे. तसंच राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची वर्दळ वर्षभर सुरू असते. त्यामुळे ग्रामस्थ आणि राजकीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केलीय. संबंधित शिल्पकार यांना आदेश देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणेबाबत तात्काळ कळवावे. असं पत्र 20 ऑगस्ट 2024 रोजी नौसेनेला लिहिल्याचं पीडब्लूडीकडून स्पष्ट करण्यात आलंय.
भारतीय नौदलाचं स्पष्टीकरण
तर या घटनेसंदर्भात भारतीय नौदलानेही स्पष्टीकरण दिलंय. '4 डिसेंबर 2023ला नौदल दिनी सिंधुदुर्गवासियांना अर्पण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सोमवारी दुर्दैवीरित्या जे नुकसान झाले त्याविषयी आम्हाला दु:ख आहे. राज्य सरकार, संबंधित तज्ज्ञमंडळी आणि नौदलातील अधिकाऱ्यांचं पथक तातडीने या दुर्घटनेचं कारण शोधण्यासाठी काम सुरु करेल. ही दुर्दैवी दुर्घटना होती. छत्रपती शिवरायांचा पुतळ्याची दुरुस्ती करुन तो पुन्हा राजकोट किल्ल्यावर लवकरात लवकर बसवला जाईल. असं स्पष्टीकरण नौदलाकडून देण्यात आलंय..
या प्रकरणी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊत यांनी केलीय तर राजीनामा मागणं हे राजकारण असल्याचं म्हणत मंत्री उदय सामंत यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. पुतळा कोसळण्याचा दोष नौदलावर ढकलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीकास्त्र डागलंय..
'दोष नौदलावर ढकलण्याचा प्रयत्न'
छत्रपती शिवाजी महाजारांच्या पुतळ्याच्या बाबतीत भाजप भ्रष्टाचार करेल असं वाटलं नव्हतं, इथेही त्यांचा एक कॉन्ट्रॅक्टर मित्र आहे. कामाचा दर्जा भयानक आहे. भावनेला नव्हे तर निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून उद्घाटन करण्यात आलंय आणि मग, त्यांचे नेहमीचेच ट्रोल्स आणि निर्लज राजकारणी आता दोष भारतीय नौदलावर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत, किती लज्जास्पद आहे हे. असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं ही दुदैवी आणि तितकीच वेदनादायी घटना आहे. मात्र ज्यांच्यावर महाराजांच्या पुतळ्याच्या देखभालीची जबाबदारी होती त्या यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवताना दिसताहेत..