आमदार नितेश राणेंकडून 'सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिवल'ची घोषणा

 कंटेनर थिएटरमध्ये यावर्षी पुन्हा एकदा ‘सिंधुदुर्ग फिल्म फेस्टिवल २०२०’ (SNFF) चे आयोजन 

Updated: Feb 22, 2020, 11:40 AM IST
आमदार नितेश राणेंकडून 'सिंधुदुर्ग नॅशनल फिल्म फेस्टिवल'ची घोषणा  title=

देवगड : सर्वाधिक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त, सामाजिक दिशा देणाऱ्या चित्रपटांचे दिग्दर्शक राजदत्त तसेच सिनेसृष्टीत स्वत:च्या कामाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांना ‘एसएनएफएफ जीवनगौरव २०२०’ देऊन सन्मानित केले जाईल अशी घोषणा आमदार नितेश राणे यांनी केली आहे. देवगड येथील कंटेनर थिएटरमध्ये यावर्षी पुन्हा एकदा ‘सिंधुदुर्ग फिल्म फेस्टिवल २०२०’ (SNFF) चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी अभिनेते अनिल गवस, ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्री स्नेहल शिदम, महोत्सव दिग्दर्शक सुमित पाटील, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा सरचिटणीस बाळा खडपे आदी मान्यवर उपस्थित होते.

एसएनएफएफच्या माध्यमातून सिंधुदुर्गतील निसर्गसौंदर्यासोबतच पर्यटनाची अनुभूती देखील यानिमित्ताने घेता येते. यावर्षी देखीलकंटेनर थिएटर त्याच उत्साहात ‘एसएनएफएस २०२०’ साठीसज्ज झाले आहे. यंदा ५ ते ८ मार्च दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. दशावतार आवडीने पाहणारा प्रेक्षकवर्ग आता कमी झाला आहे. यासाठी तो अधिक आकर्षक कसा वाटू शकेल, अधिक रंगीत कसा दिसेल यासाठी ‘एसएनएफएफ २०२०’चे व्यासपीठ कार्य करणार असल्याचे नितेश राणे यावेळी म्हणाले. 

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या संकल्पनेचे कौतुक केले. एसएनएफएफमुळे फिल्मफेस्टिवलबद्दल देशभरात चर्चा झाली याचा आनंद असल्याचे नितेश राणे यावेळी म्हणाले. 

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘भोंगा’ सिनेमाचा विशेष प्रयोग यावेळी रसिकांना पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे रेडू हा मालवणी सिनेमा, देसी बॅण्ड राजस्थानी, झलकी (हिंदी), अभ्यक्तो (बंगाली), गंगोदका (कन्नड) या सिनेमांची मेजवानी असणार आहे. त्याचसोबत विविध स्पर्धांमध्ये पुरस्कारप्राप्त, उल्लेखनीय लघुपट देखील या महोत्सवात पाहायला मिळणार आहेत.

४८ तासांमध्ये बनवा लघुपट 

फिल्ममेकर्सना स्वत:चीकला दाखवण्यासाठी मोठी संधी एसएनएफएफ घेऊन येत आहे. यामध्ये ४८ तासांमध्ये फिल्ममेकर्सना आपली कला सादर करायची आहे.

५ ते ६ मार्च दरम्यान देवगडमध्ये ही स्पर्धा होत असून कला आणि संस्कृती आणि पर्यटन या दोन विषयांवर फिल्ममेकर्सना लघुचित्रपट अथवा माहितीपट (डॉक्युमेंट्री) बनवायची आहे. या स्पर्धेसाठीचे चित्रिकरण केवळ देवगडमध्येच करायचे आहे.

विद्यार्थी, तरुण,महिला वर्गासाठी ही चर्चासत्र असणार आहेत. शाळेतल्या मुलांसाठी सिनेमा कसा पहावा ?, चित्रपट सृष्टीतील स्त्रियांचा सहभाग, चित्रपटांमुळे संस्कृती आणि पर्यटन क्षेत्राला मिळालेलेप्रोत्साहन या विषयांवर हे चर्चासत्र होणार आहे. एसएनएफएफसाठी सिनेसृष्टीतील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हे मान्यवर या चर्चासत्रांमध्ये सहभागी होतील.