BREAKING : भाजप आमदार नितेश राणे यांची आजची रात्रही कोठडीतच

भाजपा आमदार नितेश राणे हे दोन दिवसांपासून पोलीस कोठडीत आहेत

Updated: Feb 4, 2022, 06:11 PM IST
BREAKING : भाजप आमदार नितेश राणे यांची आजची रात्रही कोठडीतच title=

सिंधुदुर्ग :  शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत आज संपली. नितेश राणे यांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालायाने नितेश राणे यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. 

यानंतर नितेश राणे यांच्या जामीनासाठी त्यांच्या वकिलांनी अर्ज दाखल केला. पण त्यांच्या जामीन अर्जावर उद्या दुपारी तीन वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे नितेश राणे यांची आजची रात्रही तुरुंगातच जाणार आहे. 

सरकारी वकीलांचा युक्तीवाद
धीरज जाधव व ज्ञानेश्वर माऊली या आरोपीना अटक करायची आहे. ज्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये कट शिजला ती गाडी जप्त करायची आहे. यासाठी 8 दिवसाची पोलीस कोठडी हवी असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता. तर, तपासात आम्ही सहकार्य केलं असा दावा राणे यांचे वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी केला.  न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून १८ फेब्रुवारीपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

नारायण राणे सिंधुदुर्गात
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिल्लीतून आज सिंधुदुर्गात धाव घेतली आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. असं असतानाही नारायण राणे सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. 

संतोष परब यांची प्रतिक्रिया
दरम्यान, शिवसैनिक संतोष परब यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नितेश राणे यांना अटक झाल्याने मला आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळाला आहे, असं संतोष परब यांनी म्हटलं आहे.