अहमदनगर : अहमदनगरमध्ये भाजपच्या उपमहापौरांची एक ऑडिओ क्लिप सध्या जोरात व्हायरल होतेय. या ऑडिओ क्लिपमध्ये उपमहापौर श्रीकांत छिंदम छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवजयंती बद्दल अपशब्द उच्चारत असल्याचा आरोप बांधकाम विभागाचा कर्मचारी असलेल्या अशोक बिडवे यांनी केलाय. याबद्दल बिडवे यांनी कामगार युनियकडे तक्रारही दाखल केलीय.
एका कामासंदर्भात छिंदम यांनी बिडवे यांना फोन केला... या कामासंबंधी बोलत असतानाच छिंदम यांनी शिवाजी महाराजांसंदर्भात अपशब्द उच्चारले असा आरोप करत बिडवे यांनी ही ऑडिओ क्लिपही सादर केलीय.
बिडवे : हा, बोला साहेब
छिंदम : बिडवे काल माणसं आले नाहीत
बिडवे : काल किन्नर साहेब बोलले ना तुमच्यासोबत, मी पण त्यांना बोललो होतो छिंदम साहेबांना फोन...
छिंदम : माणसं पाठवणार आहे का नाही तेवढं सांग फक्त... मला कुणाचं नाव नको सांगू...
बिडवे : बरं बरं पाठवतो साहेब... हे शिवजयंती होऊ द्या ना साहेब... माझं म्हणणं असं होतं...
छिंदम : ते गेलं उडतं?... तू काय शिवाजीच्या.... व्हय रे... इथं लोकं काय... वाट बघतो काय तू...
बिडवे : अहो साहेब सकाळी सकाळी चांगलं बोला
छिंदम : मंग...
बिडवे : मंग... मंग असं बोलतात काय साहेब!
छिंदम : आम्ही काय मूर्ख आहेत काय?
बिडवे : मूर्खाचा विषय काय? माणसं नाहीत म्हणून मी तुम्हाला सांगतोय शिवजयंती होऊन जाऊ द्या, साहेब...
छिंदम : माझ्या घरचं काम आहे का ते....
बिडवे : मग तुम्ही नीट बोला ना राव साहेब... असं काय बोलता तुम्ही
छिंदम : मग तू एक काम कर ना... शिवजयंतीचा एवढाच पुळका आहे तर चार माणसं वाढवून घे ना पालिकेतून
बिडवे : माणसं नाहीत म्हणून... तुमचं काम कधी ऐकलं नाही का कधी याच्या अगोदर?
छिंदम : माणसं पाठव, बाकीचं नको सांगू तू...
अवघ्या तीन दिवसांवर शिवजयंती आली असताना, उपमहापौर छिंदम यांनी शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. या आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झालीय. या प्रकारानंतर उपमहापौर छिंदम यांनी माफी देखील मागितली. मात्र छिंदम यांच्या वक्तव्याचा निषेध करत, त्यांची भाजपमधून तसंच उपमहापौरपदावरून हकालपट्टी करण्याची घोषणा शहर जिल्हाध्यक्ष आणि खासदार दिलीप गांधी यांनी केलीय.