नदीत बुडणाऱ्या या मायलेकांची सुटका

शाळेत जातांना नदीत बुडणा-या या मायलेकांची या बहाद्दरानं शोर्य गाजवत सुटका केली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 26, 2018, 09:18 PM IST

विशाल करोळे, औरंगाबाद : आज आम्ही तुम्हाला औरंगाबादच्या एका शूर मुलाची भेट घडवणार आहोत, या शाळकरी मुलानं स्वत:च्या जीवाची पर्वा न करता एक 5 वर्षीय मुलगी आणि तिच्या आईचा जीव वाचवलाय. शाळेत जातांना नदीत बुडणा-या या मायलेकांची या बहाद्दरानं शोर्य गाजवत सुटका केली.

आकाश खिल्लारेवर सध्या कौतुकाचा वर्षाव

औरंगाबादच्या हातमाळी या छोट्याशा गावात राहणारा आणि दहाव्या वर्गात शिकणारा हा आकाश खिल्लारे वर सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय. सोमवारी झोपेतून उठायला उशीर झाला म्हणून आकाश धावत धावतच 3 किलोमीटर दूर असलेल्या शाळेकडं निघाला. त्याच्या सोबत त्याची बहिणसुध्दा होती.

एक बाई पाण्यात बुडताना दिसल्या

गावचा नदीवरील बंधारा ओलांडतांना त्यांना एक लहान मुलगी आणि एक बाई पाण्यात बुडताना दिसल्या, त्या जीवाच्या आकांतानं ओऱडत होत्या, मात्र त्यांना वाचवायला तिथं कुणीही नव्हतं, आकाशनं आणि त्याच्या बहिणीच्यानं हे पाहिलं आकाशनं कसलाही विचार न करता, पाठीवरून दप्तर काढले आणि त्यानं त्यांना वाचविण्यासाठी त्यान थेट नदीच्या डोहातही उडी मारली शेवाळ असलेल्या खोल पाण्यातून त्यांना बाहेर काढणं जिकरीचं काम होतं, मात्र आकाशनं स्वताःच्या जिवाची पर्वा न करता या मायलेकींना पाण्याच्या बाहेर काढून त्यांचा जिव वाचवला.

तिला वाचवायला माऊलीनं उडी मारली

नदीवर कपडे धूत असतांना लहान मुलगी पाण्यात पडली आणि तिला वाचवायला माऊलीनं उडी मारली, मात्र दोघीही बुडायला लागल्यावर या माऊलीनं पांडूरंगाचा धावा केला आणि आकाशच्या रुपात पांडुरंगच मदतीला आल्याचं आणि  आकाशानं नव जीवन दिल्याचं ही माऊली सांगतेय.

आकाशच्या शाळेचे शिक्षक सुद्धा अभिमान

खर तर लहानपणी आकाश नदीत पोहायला गेल्यावर त्याचे आजोबा त्याला मारायचे, बुडून जीव जाईल याची त्यांना सतत भिती, मात्र तिच लपून शिकलेली कला आज लोकांचा जिव वाचवायला कामी येत असल्यांनं अभिमान वाटत असल्याचं ते सांगताय, तर आकाशच्या शाळेचे शिक्षक सुद्धा अभिमान असल्याचं सांगतायत.

एका मुलीचा नदीत डुबतांना जीव वाचवला

गरीब कुटूंबातील आकाश, त्याचे आई वडील उसतोडीला गेले आहेत आपल्या दोन लहान बहिणींसोबत आणि वृद्ध आजोबांसोबतच घरची सगळी जबाबदारी तो उचलतो, याआधीही गेल्या वर्षी आकाशानं शाळेजवळ एका मुलीचा नदीत डुबतांना जीव वाचवला होता. 

मोठं होवून पोलिस अधिकारी होत देशाची सेवा करण्याचंही त्याचं स्वप्न आहे, आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय, आकाश सारखे शौर्य गाजवणारे लोक ख-या अर्थान स्वताच्या कामातून देशसेवा करतायत, त्यामुळंच आकाशच्या या शौर्याला झी मिडियाचाही सलाम.