प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : जिल्ह्यातील साक्री शहरातील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या वसतिगृहातील एक विद्यार्थिनीने एका बाळाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे या मुलीने वसतिगृहातील स्वच्छतागृहात स्वतःची प्रसूती केली. या धक्कादायक प्रकारांनंतर वसतिगृहाच्या गृहपाल याना निलंबित करण्यात आले आहे. या मुलीने नवजात मूल एका शाळेच्या भिंतीजवळ सोडून दिले होते.
आदिवासी विकास विभागाच्या कारभाराच्या चिंधड्या उडविणारी घटना साक्री तालुक्यात समोर आली आहे. शहरातील सावित्रीबाई फुले आदिवासी मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एक १८ वर्षीय विद्यार्थिनीने एक बाळाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे या मुलीने वसतिगृहातील स्वच्छतागृहात मुलीला जन्म दिला आहे. स्वतःच तिने प्रसूती करून नवजात मुलाला एका शाळेजवळ सोडून दिले. नवजात मुलगा सांपडल्यानंतर या सर्व घटनेचे बिंग फुटले. या प्रकरणी गृहपाल महिलेले निलंबित करण्यात आले असून, पीडित मुलगी आणि तिच्या बाळाला धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन्हीची प्रकृती स्थिर झाल्यानंतर पुढील तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या मुलीची वैद्यकीय चाचणी नोव्हेंबर २०१९ मध्ये करण्यात आली होती, त्यावेळी मासिक पाळी नियमित असल्याची वैद्यकीय नोंद घेण्यात आली आहे. मुलीच्या अन्य चाचण्याही सर्वसाधारण आल्या आहेत. एक विद्यार्थिनी नऊ महिन्याच्या गर्भधारणेनेनंतर एका मुलाला जन्म देते, तोवर वसतिगृह चालकांना काहीही कळत नाही, डॉक्टरांना संशय येत नाही, त्यामुळे वसतिगृहांचा कारभार आणि तिथे होणाऱ्या वैद्यकीय तपासण्या किती संशयास्पद आहे हे स्पष्ट होते.
कृषी विद्यालयात शिकणाऱ्या या पडिती मुलीला नेमके कोणापासून दिवस राहिले? तिने हा सर्व प्रकार कोणाच्या सांगण्यावरून लपवून ठेवला का ? नऊ महिन्यात कोणालाही संशय का आला नाही ? वस्तीगृह प्रशासन कोणाला पाठीशी घालत आहे का ? असे एक ना अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत त्यांची उत्तर पोलीस तपासात उघड होतील, मात्र आदिवासी मुलींच्या आयुष्याची अश्या पद्धतीने खेळणाऱ्या नराधमांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.