धक्कादायक! पोषण आहारातून 23 विद्यार्थ्यांना विषबाधा, हे कारण आलं समोर

उमरगा तालुक्यातील पेटसांगवी शाळेत एक धक्कादायक प्रकार घडलाय. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या पोषण आहारातून २३ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे.

Updated: Mar 29, 2022, 05:33 PM IST
धक्कादायक! पोषण आहारातून 23 विद्यार्थ्यांना विषबाधा, हे कारण आलं समोर  title=
प्रातिनिधिक छायाचित्र

उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील पेटसांगवी शाळेत एक धक्कादायक प्रकार घडलाय. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या पोषण आहारातून २३ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे.

सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला गेला. मात्र, काही वेळाने विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ होण्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सास्तुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक खबरदारी म्हणून या विद्यार्थ्यांना उमरगा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उस्मानाबादचे आमदार ज्ञानराज चौघुले यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रुग्णालय प्रशासनाला योग्य उपचाराच्या सूचना दिल्या.

सदर शाळेतील विद्यार्थ्यांना जो पोषण आहार देण्यात आला, त्यातील खिचडीत पाल आढळून आली. त्या पालीचे विष खिचडीत पसरले गेले. त्यामुळेच मुलांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. ही पाल खिचडीत कशी आली असा प्रश्न उपस्थित होत असून या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यावर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सुमारे १२ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवून नंतर या मुलांना रात्री उशिरा घरी सोडण्यात आले आहे.