कल्याण-डोंबिवली पालिकेत शिवसेनेला मोठा झटका, घोलप यांचे पद रद्द

 केडीएमसीत शिवसेनेला मोठा झटका बसलाय.

Updated: Oct 26, 2018, 11:12 PM IST
कल्याण-डोंबिवली पालिकेत शिवसेनेला मोठा झटका, घोलप यांचे पद रद्द title=

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विद्यमान शिवसेना नगरसेविका आणि माजी महापौर वैजयंती घोलप यांचं नगरसेवकपद रद्द झालंय. या निर्णयामुळे केडीएमसीत शिवसेनेला मोठा झटका बसलाय. घोलप या कल्याणच्या रामबाग प्रभागातून आत्तापर्यंत सलग पाचवेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. 

२०१० नंतर त्यांचा प्रभाग ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर त्यांनी धनगर जातीचं प्रमाणपत्र जोडत निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांना महापौरपदही मिळालं होतं.  दरम्यान ओबीसी प्रवर्गातून घोलप यांनी लढवलेली निवडणूक रद्द ठरवण्याची मागणी प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार गौरव गुजर यांनी केली होती. त्यानुसार झालेल्या सुनावणीत पुराव्यांच्या आधारे जातवैधता समितीने निकाल देत घोलप यांचे ओबीसी प्रमाणपत्र रद्द केलं.

यानंतर जातवैधता पडताळणी समितीचा हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप करत घोलप यांनी याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र तिथेही त्यांची याचिका फेटाळून लावण्यात आल्यानं केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी वैजयंती घोलप यांच्यावर अपात्रतेची कारवाई करत त्यांचं नगरसेवकपद रद्द केलं. 

या निर्णयामुळे केडीएमसीत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. आता ऐन लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत रामबाग प्रभागात पोटनिवडणूक होण्याची शक्यता असून त्यावेळी शिवसेना आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.