'सरकार चालवताना वादाचे विषय टाळा, परिस्थिती सामंजस्याने हाताळा'

अजित पवारांचा शिवसेना-काँग्रेसला सल्ला.

Updated: Dec 15, 2019, 12:47 PM IST
'सरकार चालवताना वादाचे विषय टाळा, परिस्थिती सामंजस्याने हाताळा' title=

दीपक भातुसे, झी मीडिया, नागपूर: राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार स्थिर ठेवण्यासाठी तिन्ही पक्षांनी वाद टाळून परिस्थिती सामंजस्याने हाताळण्यावर भर दिला पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले. त्यांनी रविवारी 'झी २४ तास'शी संवाद साधला. यावेळी त्यांना राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण होणार का, याविषयी विचारणा करण्यात आली. या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी म्हटले की, तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी सरकार चालवताना ज्या विषयांमुळे परस्परांमध्ये अंतर निर्माण होईल, अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्याऐवजी राज्याच्यादृष्टीने हिताच्या असलेल्या शेतकरी, महागाई आणि बेरोजगारीसारख्या समस्या सोडवण्यास प्राधान्य द्यायला पाहिजे. शेवटी कोणत्या मुद्द्यावर किती ताणायचं यावर सगळे अवलंबून असते, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

'अजित पवारांची चिंता करू नका, हे सरकार पाच वर्षे तेच टिकवतील'

यावेळी अजित पवार यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याबद्दल स्पष्टपणे बोलणे टाळले. वडिलधाऱ्यांचा आदर करणे, ही आपली संस्कृती आहे. मात्र, देशपातळीवरील विषयांसंदर्भात राष्ट्रीय नेत्यांनी बोलावे. महाराष्ट्रातील नेत्यांनी केवळ राज्यातील प्रश्नांसंदर्भात बोलायला पाहिजे. राज्यापुढे सध्या अवकाळी पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान, कर्जमाफी आणि पीकविमा यासारखे अनेक महत्त्वाचे विषय असल्याचे पवार यांनी सांगितले.

तसेच सावरकरांबाबत शिवसेनेनी काय भूमिका घ्यावी, हे मी सांगणार नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु, कोणताही शब्द वापरून उचकावण्याचा प्रयत्न करू नये. या गोष्टींविषयी उत्तर द्यायला उद्धव ठाकरे खंबीर आणि समंजस आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा कितीही तापला तरी आम्ही तिघांनी तो सोडला तर काही अडचण येणार नाही. त्यासाठी वरिष्ठ नेतृत्वाने समंजस भूमिका घेऊन कोणत्या विषयांना प्राधान्य द्यायचे, हे ठरवले पाहिजे. वरिष्ठांचा निर्णय प्रत्येक तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना मान्य असेल, असे सांगत अजित पवार यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.