शिर्डी : शिर्डीत साई समाधी शताब्दी वर्षाची जल्लोषात सुरुवात झाली आहे. सकाळच्या सुमारास साईबाबांच्या पादुकांची सुवर्णरथातून मिरवणूक काढण्यात आली. १८ ऑक्टोबर १९१८ ला साईबाबांनी शिर्डीत समाधी घेतली होती.
या घटनेला येत्या १८ ऑक्टोबर २०१८ ला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने साईबाबा संस्थानकडून शिर्डीत महासमाधी उत्सव साजरा केला जातोय. या उत्सवासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत. सकाळी दहाच्या सुमारास नव्याने तयार झालेल्या साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रपतींचं विमान उतरेल. त्यानंतर रस्ते मार्गाने राष्ट्रपती दाखल होतील. यानंतर राष्ट्रपती साईबाबा समाधीचं दर्शन घेतील. त्यानंतर एका जाहीर कार्यक्रमात राष्ट्रपती सहभागी होतील.
राष्ट्रपतींचा हा तीन तासांचा दौरा असेल. राष्ट्रपतींसह राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री गजपती राजू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.