यंदाच्या वर्षी साईबाबा मंदिराला भाविकांकडून कोट्यवधींचं दान

दान स्वरुपात फक्त पैसेच नव्हे, तर इतरही बऱ्याच मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. 

Updated: Dec 30, 2019, 11:02 AM IST
यंदाच्या वर्षी साईबाबा मंदिराला भाविकांकडून कोट्यवधींचं दान  title=
संग्रहित छायाचित्र

शिर्डी : shirdi शिर्डी येथे असणाऱ्या साईबाबांच्या मंदिराला भेट देऊन आपली श्रद्धासुमनं अर्पण करणाऱ्या भाविकांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. भोळ्याभाबड्या भक्तीपोटी हे भाविक दूरची वाट धरत बाबांच्या दर्शनासाठी येतात. अशा या भक्तिच्या गाभाऱ्यात आल्यानंतर साईबाबांच्या चरणी भक्तगण लहानमोठ्या स्वरुपात पैसे आणि इतर काही मौल्यवान गोष्टींचं दानही करतात. यंदाच्या वर्षी साईबाबा मंदिराच्या तिजोरीमध्ये अशाच प्रकारचे विक्रमी दानाची नोंद झाल्याचं कळत आहे. 

२०१९ या वर्षभरात २८७ कोटींच्या रकमेची साईबाबा मंदिर प्रशासनाच्या तिजोरीत भर पडली आहे. यंदाच्या वर्षी सोन्याच्या दानात मात्र निम्याने घट झाल्याची बाब समोर आली आहे. या वर्षी भक्तांनी दान केलेल्या रकमेचा एकूण आकडा २८७ कोटी ६ लाख ८५ हजार ४१५ रुपये इतका असल्याचं कळत आहे. यंदा या मंदिराला भेट देणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी असली तरीही दान करण्यात आलेली रक्कम मात्र विक्रमी आकडा दर्शवत आहे.

शिर्डीतील साईबाबा मंदिरात आलेल्या दानामध्ये मागील वर्षापेक्षा दोन कोटींहुन अधिक दान प्राप्त झालं आहे. दक्षिणा पेटीत १५६ कोटी ४९ लाख २ हजार ३५० रुपयांच गुप्तदानही करण्यात आलं आहे. त्याशिवाय देणगी खिडकीवर ६० कोटी ८४ लाख ८ हजार ५९० रुपयांच दान करण्यात आलं आहे. तर, चेक आणि डीडीच्या स्वरुपात २३ कोटी ३५ लाख ९० हजार ४०९ रुपये दान म्हणून देण्यात आले आहेत. 

मनीऑर्डरच्या स्वरुपात २ कोटी १७ लाख ८३ हजार ५१५ रुपये; डेबीट- क्रेडीट कार्डद्वारे १७ कोटी ५९ लाख ११ हजार ४२४ रुपये आणि ऑनलाईन देणगीद्वारे १६ कोटी २ लाख ५१ हजार ६०६ रुपये इतकं दान करण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त मंदिर संस्थानाला यंदाच्या वर्षी १९०४८.८६० ग्रॅम सोनं आणि ३९१७५७.४७० ग्रॅम चांदीसुद्धा दान स्वरुपात देण्यात आली आहे.