राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का; 'या' नेत्याचा पक्षाला अलविदा

आगामी विधानसभेत  मालेगावमध्ये  काँग्रेस व एमआयएम अशी तुल्यबळ लढत पाहायला मिळेल.

Updated: Aug 30, 2019, 07:52 AM IST
राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का; 'या' नेत्याचा पक्षाला अलविदा title=

निलेश  वाघ , झी मीडिया , मालेगाव:- मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघाचे प्रमुख दावेदार माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी आपल्या समर्थक २०  नगरसेवकांसह एमआयएम पक्षात प्रवेश केला. मुफ्ती यांच्या प्रवेशाने मालेगावात एमआयएमची ताकद वाढली आहे. 

प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रमुख उपस्थितीत मालेगावच्या मुशावर्त चौकात हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. तीन तलाकच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका न  घेतल्याने मौलाना मुफ़्ती मोहम्मद इस्माइल यांनी २० नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत तातडीने हज यात्रेसाठी रवाना झाले होते. 

त्यामुळे  मालेगावच्या राजकारणात मोठी अस्वस्थता पसरली होती. नुकतेच मौलाना मुफ्ती इस्माईल हज यात्रेवरून मालेगावात परतले. मालेगावमध्ये  दाखल  होताच  मुफ्ती  यांनी  एमआयएममध्ये प्रवेश घेतला. मौलाना मुफ़्ती यानी एमएएममध्ये प्रवेश घेतल्याने मालेगावात पक्षाची ताकद वाढली आहे. 

मौलाना मुफ्ती यांनी मालेगावच्या राजकारणात स्थान निर्माण करत आधी जनता दल व नंतर  काँग्रेसचा  बालेकिल्ला  समजल्या  जाणाऱ्या  मालेगाव मध्य  मतदार संघातून २००९ साली जनसुराज्य पक्षाकडून उमेदवारी मिळवत थेट आमदारकीला गवसणी घातली होती.

महापालिकेची सत्ता  आपल्याकडे  ठेवण्यातही त्यांना यश  आले. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी  काँग्रेसमध्ये  प्रवेश  केला. मात्र, २०१४ साली  काँग्रेसचे शेख यांनी मुफ्ती इस्माईल यांचा  पराभव केला.  मौलाना मुफ्ती यांनी  एमआयएममध्ये प्रवेश करत  काँग्रेससमोर  मोठे  आव्हान निर्माण झाले आहे. आगामी विधानसभेत  मालेगावमध्ये  काँग्रेस व एमआयएम अशी तुल्यबळ लढत पाहायला मिळेल.   

मालेगाव महानगरपालिकेच्या २०१७ साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला २० जागांवर विजय मिळाला होता. तर काँग्रेसला २८, शिवसेना १३, भाजप ९, एमआयएम ७, जनता दल ६ आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता.