वसईत दहशत! शहरात मोकाट फिरत आहेत सीरियल रेपिस्ट, माहिती देणाऱ्यांना बक्षीस देणार पोलीस

Vasai Crime News:  नालासोपाऱ्यात मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या विकृतांची दहशत आहे. पोलिसांनी या आरोपींची छायाचित्रे प्रसिध्द केली असून माहिती देणाऱ्यांना बक्षीस जाहीर केलं आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 23, 2023, 02:59 PM IST
वसईत दहशत! शहरात मोकाट फिरत आहेत सीरियल रेपिस्ट, माहिती देणाऱ्यांना बक्षीस देणार पोलीस title=
Serial Rapist Threat in Vasai Virat Police Conduct Search Operation Mumbai News in Marathi

प्रथमेश तावडे, झी मीडिया

Vasai Crime News:  वसई-विरार शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शहरात एक सिरीयल रेपिस्ट फिरत असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकारामुळं पालकांमध्ये व मुलींमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. तुळींज पोलिसांनी दोन संशयित आरोपींचे फोटो प्रसिद्ध करत पालकांना व मुलींना सावधान राहण्याचे आवाहन केले आहे. तसंच, या आरोपींची माहिती देणाऱ्यांना पोलिस बक्षीसही जाहिर करणार आहेत. मात्र, तब्बल 5 वर्षांनंतर पु्न्हा असाच प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

वसई-विरार शहरात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाची दहशत पसरली आहे. हा नराधम मुलींना रस्त्यात अडवून त्यांना अडोशाला घेऊन जाऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. नालासोपारा शहरामध्ये शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून तसेच घराबाहेर खेळणार्‍या चिमुलकल्या मुलींना आडोशाला नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना घडत आहेत. या प्रकरणी तुळींज पोलिसांमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

पहिली घटना ५ ऑक्टोबर रोजी तर दुसरी घटना १५ नोव्हेंबर रोजी घडली आहे. यामध्ये अनुक्रमे ७ आणि ९ वर्षांच्या मुलींचा अज्ञात विकृतांनी विनयभंग करून लैंगिक अत्याचार केला आहे. या मुलींनी पालकांना हा प्रकार सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे यांनी दिली. या दोन्ही प्रकरणात दोन विकृतांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

पोलिसांनी या प्रकरणात नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. तुळींज पोलिसांनी या दोन्ही विकृत आरोपींना (सिरियल मॉलेस्टर) पकडण्यासाठी पथके बनवली आहे. त्यांची छायाचित्रे ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत. त्यांची माहिती देणार्‍यास बक्षिसे जाहीर करण्यात आल्याची माहिती तुळींज पोलिसांनी दिली आहे. मात्र या घटनेमुळं पालकांमध्ये घबराट उडाली आहे