प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : रत्नागिरीच्या स्थानकात सायन्स एक्प्रेस दाखल झालीय. या एक्स्प्रेसला पाहण्यासाठी शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतायत.
हवामानातील बदल, निसर्गसंवर्धन विज्ञान संशोधनातील इतर विषयांवर समग्र माहितीचा खजिना असलेल्या वातानुकूलीत 'सायन्स एक्स्प्रेस'चं रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. आता सर्वांसाठी ही ट्रेन खुली करण्यात आली. ही ट्रेन बघण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील शाळा रत्नागिरीच्या रेल्वे स्थानकात दाखल झाल्यात.
सायन्स एक्स्प्रेसचा रत्नागिरी स्थानकावर मुक्काम १४ ते १६ जुलैपर्यंतचा असेल. युवा वर्गात विज्ञानाबाबत रुची निर्माण करण्याच्या हेतूनं ३० ऑक्टोबर २००७ मध्ये सायन्स एक्स्प्रेस सुरू झाली होती. या फिरत्या विज्ञान प्रदर्शनाचं व्यवस्थापन विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटरमार्फत पाहिलं जातं. १६ डब्यांची ही संपूर्ण वातानुकूलीत रेल्वेगाडी देशातील सर्वात लांब आणि सर्वात मोठी विज्ञान प्रदर्शन म्हणून गणली जाते.
या सायन्स एक्स्प्रेसमार्फत जगावर होणा-या वातावरणीय बदलाबाबत जागृती आणि त्याला सामोरं जाण्यासाठीच्या उपाययोजना याची माहिती देण्यात आलीय. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून रत्नागिरीत दाखल झालेल्या रुळांवरील विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन केलंय.
या एक्स्प्रेसमध्ये विविध वैज्ञानिक दालनं आहेत. ही दालनं म्हणजेच १६ डब्यांची संपूर्ण ट्रेन वातावरणातील बदल, वातावरणातील बदलांचा परिणाम, वातावरणीय बदलांसंदर्भात आंतरराष्ट्रीय समझोते, बदलत्या वातावरण समस्येला सामोरे जाताना शाळा आणि रस्ते तसंच घरी वावरताना आपण काय करु शकतो यावर भर देऊन डिझाईन करण्यात आलीय. त्यामुळे या एक्स्प्रेसला एकदा तरी भेट द्यायलाच हवी...