केसरकर- राणे मनोमिलनाचा शिंदे गटाला फायदा; विनायक राऊतांना झटका

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत विजय मिळवत शिंदे गटाने थेट ठाकरे गटाच्या विनायक राऊतांना झटका दिला आहे. 

Updated: Nov 12, 2022, 09:37 PM IST
केसरकर- राणे मनोमिलनाचा शिंदे गटाला फायदा; विनायक राऊतांना झटका title=

उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग : केसकर आणि राणे यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला सर्वज्ञात आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यावरही यांच्यातील वाद पेटला होता. अखेर पक्ष नेतृत्वाने दखल घेत यांच्यात मनोमिलन घडवून आणले.  केसरकर- राणे मनोमिलनाचा शिंदे गटाला फायदा झाला आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत विजय मिळवत शिंदे गटाने थेट ठाकरे गटाच्या विनायक राऊतांना झटका दिला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर(School Education Minister Deepak Kesarkar) आणि भाजपचे आमदार नितेश राणे(BJP MLA Nitesh Rane) हे एकत्र आले. या दोघांच्या नेतृत्वात पाहिला विजय शिंदे-भाजप आघाडीने मिळवला आहे. 

भाजप- शिंदे गटाने 15 पैकी 15 जागांवर विजय मिळवला

भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीने सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पाहिला विजय संपादीत केला आहे. सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप- शिंदे गटाने 15 पैकी 15 जागांवर विजय मिळवत आघाडीचा धुव्वा उडवला आहे. 

दिपक केसरकर व नितेश राणे मनोमिलना नंतर तळकोकणात युतीचा पहिला विजय झाला आहे. या विजयानंतर भाजप व शिंदे गटाने मोठा जल्लोष केला. ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी हा झालेला पराभव विनायक राऊत यांना धक्का मानला जात आहे.