Viral Video Of School Students: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत काही शाळकरी मुलं शिक्षिकेच्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत. यात शिक्षिका इतिहासात कोणी कुणाच्या हातावर तुरी दिल्या असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारते. यावर विद्यार्थी भन्नाट उत्तरे देत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यानंतर अनेकांनी या व्हिडिओवर नाराजी व्यक्त केली आहे. तर, काहींनी या शिक्षेकेवरच टीका केली आहे. (Social Media Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत शिक्षिका मुलांना एक प्रश्न विचारते. काही जण याची बरोबर उत्तर देतात. मात्र, जेव्हा त्यांना संदर्भ विचारला तेव्हा मात्र त्यांना त्याचे उत्तर देता आलं नाही. हातावर तुरी देणे याचा अर्थ, एखाद्याला गाफिल ठेवून त्याची फजिती करणे असा होतो. पण मुलांना हे माहितीच नव्हतं. त्यांना या वाक्यप्रचाराचा अर्थच सांगता आला नाही.
शिक्षिकेने विचारलेल्या प्रश्नावर एक विद्यार्थी म्हणतो की, आदिलशाहाने अफजलखानाच्या हातावर तुरी दिल्या. तर, एक म्हणतो की महाराष्ट्रात तुरी जास्त झाल्याने शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या. तर, एका विद्यार्थ्यांने म्हटलं आहे की, औरंगजेबाला चांगलं वरण आवडत होतं म्हणून त्याला तुरी दिल्या. एक विद्यार्थी तर म्हणताना दिसतोय की, औरंगजेबाने शिवाजी महाराजांना संदेश पाठवला होता, मला तुरी पाहिजेत,
काही विद्यार्थ्यांनी या प्रश्नाची उत्तरे योग्य दिली असली तरी जेव्हा त्यांना संदर्भ विचारले तेव्हा त्यांना काही उत्तर देता आलं नाही. त्यामुळं त्यांनी त्यांची कल्पनाशक्ती वापरुन उत्तरे तयार केली. सदर व्हायरल झालेला व्हिडिओ कोणत्या शाळेचा आणि हे विद्यार्थी कोणत्या शाळेचे आहेत, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्रथमदर्शनी, शिक्षिकेनेच हा व्हिडिओ चित्रीत केला आहे. पण तो कोणत्या हेतूने काढला हे मात्र समोर आलेले नाहीये. सोशल मीडियावर मात्र हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. काहींनी शिक्षकांच्या शिक्षणपद्धतीवर टीका केली आहे. तर, काहींनी म्हटलं आहे की मुलं निरागस आहेत. या वयात अशी उत्तरं अपेक्षित असतात. एकाने कमेंट केली आहे की, विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या हातावर तुरी दिल्या.
व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असला तरी तो कोणत्या शाळेतला आहे व शिक्षिका कोण आहे, हे मात्र कळू शकलेले नाहीये.