सिनेमातील खलनायक ते खऱ्या आयुष्यातले हिरो! वृक्षसंवर्धक सयाजी शिंदे यांची खास मुलाखत पाहा व्हिडीओ

वृक्षसंवर्धनाचा सयाजी शिंदे यांनी दिला कानमंत्र, आईच्या उदराचं उदाहऱण देत त्यांनी पृथ्वीवरील वृक्षांचं महत्त्व सांगितलं

Updated: Jul 18, 2021, 02:00 PM IST
सिनेमातील खलनायक ते खऱ्या आयुष्यातले हिरो! वृक्षसंवर्धक सयाजी शिंदे यांची खास मुलाखत पाहा व्हिडीओ title=

मुंबई: सिनेमातील खलनायक ते खऱ्या आयुष्यातील नायक इथपर्यंतचा त्यांचा खास प्रवास आणि त्यांचं वृक्षप्रेम यावर खास मराठी लीडर या कार्यक्रमात झी 24 तासचे संपादक निलेश खरे यांनी सयाजी शिंदे यांची मुलाखत घेतली आहे. खलनायक म्हणून जरी घराघरात पोहोचले असले तरी प्रत्यक्ष जीवनात मात्र खरा हिरो आहेत. 10 लाखांवर वृक्षारोप करणारे आणि देवराईला जनमानसात पोहोचवणे सयाजी शिंदे यांच्यासोबत खास संवाद साधला आहे. 

खलनायक ते नायक प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांची संपूर्ण मुलाखत ऐका..

वृक्षांबद्दल प्रेम कसं जागृत झालं?

माणसाला पहिलं आईबद्दल प्रेम वाटतं. जगात आपल्याला आईच्या उदरानंतर ऑक्सिजन सेफ वाटतो. त्यामुळे धरती माता ही दुसरी आई आहे. तिथून झाड जगवलं पाहिजे हे मनात रुजलं. हा माझ्या आनंदाचा भाग आहे. झाडांसाठी काम करणारी माणसंही निस्वार्थी आहेत. त्यांच्यासोबत काम करायला खूप आनंद वाटतो. 

सगळ्यात कमी झाडं बीड जिल्ह्यात होती. त्यामुळे आम्ही तिथे पहिल्यांदा देवराई उभी केली. तिथे वृक्षसंवर्धनाचं महत्त्व सांगितलं. एक गाव एक सरपंच आणि 100 झाडं ही खास संकल्पना आणली आहे. 

15 ऑगस्टसाठी वृक्षसंवर्धनासाठी खास संकल्प

एक गाव एक सरपंच आणि 100 झाडं ही खास संकल्पना 15 ऑगस्टला साकारणार आहोत. एकाच दिवसांत झाडांचं शतक करण्याचा उपक्रम 15 ऑगस्टला राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचं झाडं लावून त्यांचं संवर्धन करण्याचं आवाहन सह्याद्री देवराई आणि सरपंच परिषद मुंबई यांच्यावतीनं संयाजी शिंदे यांनी आवाहन केलं.

आपली झाडं, आपणच आणायची, आपणच लावायची आणि आपणच जगवायची, मैदानातच उतरयाचं पण शतक झालंच पाहिजे असं आवाहनही सयाजी शिंदे यांनी केलं आहे. येत्या 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण होत आहे, या निमित्ताने आपल्या गावात झाडांचं शतक पूर्ण झालं, तर झाडांचं वाढदिवस आणि झाडं लावणाऱ्यांचा जाहीर सत्कार सह्याद्री देवराईतर्फे करण्यात येणार आहे.

वॉचमन ते उत्तम अभिनेता प्रवास 

आमची धरणात जमीन गेली. त्यामुळे आम्हाला अन्नपाणी नाही काही नाही. कॉलेजला असताना नोकरी नव्हती म्हणून कॉलेजला अॅडमिशन घेतली. त्यावेळी मला वॉचमनची नोकरी मिळाली. त्यावेळी 165 रुपये मिळायचे. तेव्हा जसा होते तसा आजही आहे. माझ्यासाठी छोटा मोठा असं नाहीय. अन्न आणि ऑक्सिजन सर्वांनाच सारखा लागतो. बाकी तुमच्या मनाचा खेळ आहे. तुमचं मन चांगलं तुमचं जग चांगलं.