नवी मुंबई : नवी मुंबईत (New Mumbai Airport) होणाऱ्या प्रस्तावित विमानतळाला दि बा पाटील (D B Patil) यांच नाव देण्यात यावं, अशी स्थानिक भूमिपूत्रांची मागणी आहे. या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी भूमिपूत्रांनी अनेक आंदोलनं केली. तसेच सिडकोच्या मुख्य कार्यालयाला घेरावही घातला. आता पुन्हा या विमानतळाच्या नामकरणावरुन सरकारला इशारा देण्यात आलाय. विमानतळाला दि बा पाटलांचे नाव न दिल्यास, राजधानी दिल्लीत अर्धनग्न आंदोलन छेडत आणि मुख्यमंत्र्याच्या घरासमोर आक्रोश आंदोलन छेडणार असल्याचा गंभीर इशारा पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड (Jagdish Gaikwad) यांनी दिलाय. (Panvel Deputy Mayor Jagdish Gaikwad Warn to government on New Mumbai Airport name)
दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समर्थन समिती तर्फे डोंबिवली येथील प्रगती महाविद्यालयाच्या सभागृहात विमानतळ नामकरण परीषदेचे आयोजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले गायकवाड?
"विमानतळाच्या नामकरणाच्य मागणीसाठी 29 जुलैपूर्वी पारंपरिक वेशात दिल्लीत पंतप्रधान मोदींसह हवाई मंत्र्याची भेट घेणार आहोत. त्यानंतर ही हा प्रश्न मार्गी न लागल्यास, दिल्लीत अर्धनग्न आंदोलन छेडत आपली मागणी मांडू, असं गायकवाड यांनी स्पष्ट केलं. तसेच दिल्लीत न्याय मिळाला नाही आणि त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी निर्णय न बदलल्यास मातोश्रीबाहेर घेराव घालू अन् त्यांना घराबाहेर पडू देणार नाही", असा इशाराही त्यांनी दिलाय.
विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा
नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटलांचे नाव द्यावे, या मागणीसाठी आगरी समाजाकडून मागणी केली जात आहे. या मागणीला इतर समाजासह विविध राजकीय पक्षांकडूनही पाठिंबा मिळालाय. त्यामुळे दि बा पाटलांचं नाव देण्याची मागणी जोर धरतीय. तर दुसऱ्या बाजूला मात्र या विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी शिवसेना आग्रही आहे.