हॉस्पिटलच्या मृतांच्या यादीत त्याचं नाव होतं, पण यमराजच्या यादीत नाही...मग आईला फोन आला

प्रशासनाचा आणि रुग्णालयांच्या भोंगळ कारभाराचा खरा चेहेरा समोर आला. 

Updated: Jun 9, 2021, 08:08 PM IST
हॉस्पिटलच्या मृतांच्या यादीत त्याचं नाव होतं, पण यमराजच्या यादीत नाही...मग आईला फोन आला title=

फलटण : कोरोनाकाळात अनेक नाती दुरावली गेली. अनेक कुटूंबांनी आपल्या घरातल्या जवळच्या व्यक्तीला अखेरचा निरोप दिला आहे. परंतु या काळात बरेच असे रुग्ण आहेत की, ज्यांनी या कोरोनाच्या विषाणूवर मात केली आहे. हे लोकं ठणठणीत होऊन घरी परतले आहेत आणि आपल्या रोजच्या जीवनाला सुरवात केली आहे. परंतु ही बरी होऊन आलेली व्यक्ती रुग्णालयाच्या यादीत मृत असली तर? त्या व्यक्तीच्या घरच्यांना तर नक्कीच धक्का बसेल. कारण जर ही व्यक्ती मृत असेल तर, आमच्या सोबत  इतके दिवस काढले ही व्यक्ती कोण? हा प्रश्न तर नक्की घरच्यांना पडणार.

अशीच एक घटना  सातारा जिल्ह्यातील फलटण येथे घडली आहे. येथे 20 वर्षीचा सिद्धांत मिलिंद भोसले हा तरुण कोरोनामधून बरा होऊन घरी आला, नेहमीसारखे आयुष्या जगू लागला आणि अचानक त्याच्या घरच्यांना रुग्णालयातून फोन आला की, त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही घटना ऐकल्यानंतर त्याच्या आईला धक्का बसला.

परंतु या घटनेनंतर प्रशासनाचा आणि रुग्णालयांच्या भोंगळ कारभाराचा खरा चेहेरा समोर आला. या घटनेनंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी या घटनेची चौकशी करुन योग्यती कारवाई करणार असल्याचे सांगितलं आहे.

खरे काय घडले?

मे महिन्याच्या सुरवातीला सिद्धांत भोसलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ज्यामुळे त्याला जवळच्याच रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर तो मे महिन्यातच बरा हेऊन घरी आला आणि नेहमीप्रमाणे आपले आयुष्य जगू लागला. त्यानंतर 7 जून ला आरोग्य यंत्रनेकडून, सिद्धांतच्या आईला फोन आला, ज्यामध्ये तिला सांगितले गेले की, तिच्या मुलाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

सिद्धांतचा मृत्यू झाल्याची घटना प्रशासनाकडून त्याच्या आईला सांगण्यात आल्यामुळे फलटणमधील आरोग्य यंत्रणेवर लोकांचा रोश वाढला आहे. लोकं आरोग्य यंत्रणेवर इतका विश्वास ठेवतात आणि आरोग्य यंत्रणा अशी बेजबाबदार पणे वागत असेल तर याला जाबाबदार कोण? असा प्रश्न देखील उपस्थीत केला जात आहे.

डॉ. सुभाष चव्हाण यांना या प्रकाराबद्दल विचारणा केली असता, त्यांनी चौकशी करुन कारवाई करु, असे उत्तर दिले आहे. आरोग्य यंत्रणेतील जे घटक या प्रकरणात जबाबदार असतील त्यांना पाठिशी घातले जाणार नाही असा विश्वासही त्यांनी लोकांना दिला आहे.