Karad Robbery News: कराडमध्ये एका रात्रीत दरोडेखोरांनी तब्बल 48 लाखांचा दरोडा टाकला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घरातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात हा थरार कैद झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला असून दरोडेखोरांचा कसून तपास सुरू आहे.
कराडच्या बारा डबरी परिसरात डॉ. राजेश शिंदे यांच्या घरावर धाडसी दरोडा टाकण्यात आला आहे. सात जणांच्या टोळीने चाकूचा धाक दाखवून घरातील ४८ तोळ्याचे दागिने आणि २७ लाखांची रोकड, असा एकूण ४६ लाख २० हजारांचा ऐवज लुटला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. चोरांच्या तपासासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
चोरीचा हा थरार घराजवळील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. यात संशयित आरोपी चित्रीत झाले आहेत. त्याआधारे पोलिसांना आरोपींचा शोध घेणे शक्य होणार आहे.
मध्यरात्री साडे तीनच्या सुमारास दरोडेखोर घरात घुसले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अंगाने सडपातळ, मध्यम उंचीचे व अंगात काळ्या रंगाचे पॅन्ट शर्ट घातलेले, दोघांच्या अंगात जरकीन, असा आरोपींचा वेष असल्याचं फिर्यादींनी तक्रारीत नमूद केलं आहे. तसंच, संशयित आरोपी हे मराठी व हिंदी भाषा बोलत होते, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
आरोपींनी चाकूच्या धाकाने १९ लाख २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि २७ लाखांची रोकड, असा ऐवज चोरून नेला होता. या धाडसी दरोड्यामुळे कराड शहरात खळबळ उडाली आहे. हा गुन्हा उघडकीस आणून दरोडेखोरांना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यात येणार आहे.
तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, शहर गुन्हे अन्वेषणचे राजू डांगे यांच्यासह डॉग स्कॉड दाखल झाले आहे. त्यांनी घटनास्थळावरील परिसर पिंजून काढून पुरावा शोधण्याचा प्रयत्न केला.