जावेद मुलानी, झी मीडिया सासवड: सासवड पोलिसांनी एका खुनाचा उलगडा 5 दिवसांत केला आणि आरोपीला नेपाळ बॉर्डरवरून अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी कामगार असून सासवडमध्ये हत्ये करून तो फरार झाला होता. त्याचा तपास करत पोलीस नेपाळ बॉर्डरपर्यंत पोहोचले आणि त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
मद्यधुंद कामगाराने किरकोळ कारणातून एकाची हत्या केली. त्याचा मृतदेह ओढ्याच्या कडेला टाकून फरार झाला. हा आरोपी कामगार मूळचा नेपाळचा असल्याने तो आपली दुचाकी घेऊन फरार झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच सासवड पोलिसांनी तपास सुरू केला. मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्यावेळी नेपाळच्या कामगाराची माहिती मिळाली.
पोलिसांनी तपासाची सूत्र या नेपाळी कामगाराच्या दिशेनं हलवली आणि तपास सुरू केला. या प्रकरणात मुख्य आरोपी हा नेपाळकडे निघून गेल्याचे समजताच पोलीस निरीक्षक घुगे यांनी पाच दिवसात हा गुन्हा उघडकीस आणला.
सासवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवर जाऊन मुख्य आरोपी निरंजन सहानीला बेड्या ठोकल्या.भगवान मारकड यांचा आपण दारूच्या नशेत किरकोळ वादावादातून खून केल्याचे सहानीने चौकशी दरम्यान कबूल केलं. सासवड पोलिसांनी पाच दिवसात गुन्हा उघडकीस आणल्याने त्यांचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.