कुडाळ: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचं धुमशान सुरू आहे. निर्मला नदीला पूर आल्याने 27 गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक भागांमध्ये पाणी साठलं असताना दुचाकीस्वाराने जीव धोक्यात घातला. दोन तरुण दुचाकीवरून पुराच्या पाण्यातून जात होते. त्यावेळी त्यांचा हा स्टंट त्यांच्या अंगाशी आला. हा स्टंट जीवावर बेतणार होता मात्र थोडक्यात 2 तरुण वाचले.
कोसळणार्या पावसामुळे पुलावर आलेल्या पाण्यातून दुचाकी नेण्याचा प्रयत्न करणार्या दोघा युवकांना त्यांचा "स्टंट" अंगलट आला. पाण्याच्या प्रवाहात गाडीसह 2 तरुण वाहून जाता-जाता वाचले. या तरुणांनी पुरातून गाडी पुढे नेली. ग्रामस्थांनी वेळीच मदतकार्य केल्यामुळे अनर्थ टळला.
हा प्रकार मात्र अनेकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेर्यात कैद केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना कुडाळ तालुक्यातील साळगाव इथे हा प्रकार घडला. ग्रामस्थांच्या जागरुकतेमुळे मोठा अनर्थ टळला. मुसळधार पावसात असा स्टंट जीवावर बेतू शकते हे माहीत असताना असं धाडस करणं अंगाशी येऊ शकतं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे धुमशान सुरु आहे. दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यातील अनेक कॉजवे पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले 4 दिवस बरसणा-या पावसानं मसुरे पंचक्रोशीत जनजीवन विस्कळीत झालं आहे.
रमाई नदीची पाण्याची पातळी वाढल्यानं मालवण बेळणे कणकवली मार्गावरील बागायत इथं पुराचं पाणी थेट बागायत तिठा इथल्या बाजारपेठेजवळ पोहचलं. वडाचापाट गोळवण मार्गावर वडाचापाट इथं तर पोईप धरणावर पाणी असल्यानं हा मार्ग सुद्धा वाहतुकीस बंद झाला आहे.