विठुरायाच्या दर्शनाचा पहिला मान संत मुक्ताईच्या दिंडीला

पंढरपुरात आषाढी एकादशीला प्रथम प्रवेशचा मान ज्या संतश्रेष्ठ माऊलीच्या दिंडीला असतो.

Updated: May 31, 2017, 04:28 PM IST
विठुरायाच्या दर्शनाचा पहिला मान संत मुक्ताईच्या दिंडीला title=

विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : पंढरपुरात आषाढी एकादशीला प्रथम प्रवेशचा मान ज्या संतश्रेष्ठ माऊलीच्या दिंडीला असतो, त्या संत मुक्ताईची दिंडी, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरच्या कोथळीतून रवाना झालीय. 

महाराष्ट्रातील सर्वात लांब  पल्ल्याची दिंडी म्हणून संत मुक्ताईदिंडीची आगळीवेगळी ओळख आहे. दिंडीचं यंदाचं ३०८वं वर्ष आहे. खानदेश, विदर्भ, मराठवाडा, तसंच पश्चिम महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत ३३ दिवसांत ५६० किलो मीटरचा पायी प्रवास करत आषाढी एकादशीला मुक्ताईंची दिंडी पंढरपुरात प्रवेश करते. 

दिंडी जसजसी पुढे सरकत जाते तसतशी वारकऱ्यांची संख्या वाढते. पंढरपूर मधे प्रवेश करण्याचा आणि विठुरायाच्या दर्शनाचा पहिला मान संत मुक्ताईच्या दिंडीला मिळतो हे विशेष. 

संत मुक्ताईंच्या दिंडीचा पंढरपूर प्रवेशापूर्वी वाखरीमध्ये रिंगण सोहळा रंगतो. हा सोहळा डोळ्यांचं पारणं फेडणारा असाच असतो. याच रिंगण सोहळ्यात संत मुक्ताई, निवृत्ती तसंच ज्ञानेश्वर या बहीण भावंडांची भेट घडवली जातेय. यावेळी भावंडाकडून संत मुक्ताईना साडी चोळीचा आहेर भेट दिला जातो.