घराच्या छतावरच बसवलं हवामान केंद्र

दर पाच मैलांवर जशी भाषा बदलते, तसं हवामानही बदलतं.

Updated: Jul 11, 2018, 09:14 PM IST

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, वांगणी : दर पाच मैलांवर जशी भाषा बदलते, तसं हवामानही बदलतं. पण आतापर्यंत हवामानाचा आढावा घेणाऱ्या  यंत्रणा ठराविकच ठिकाणी आहेत. पण बदलापूर-अंबरनाथमधल्या काही तरुणांनी हॅम रेडिओच्या मदतीनं मुंबई-ठाणे परिसरात १० हवामान केंद्र सुरू केलीयत. त्यापैकीच वांगणीमधलं संकेत देशपांडे यांच्या घरावर एक हवामान केंद्र आहे.  घराच्या छतावर बसवलेल्या एका बिनतारी अँन्टेनाद्वारे  रोजचं तापमान, वाऱ्याची  दिशा, हवेचा दाब, त्यातली आर्द्रता, पडणारा पाऊस याचा अचूक तपशील मिळतो, ही सगळी माहिती संगणकात साठवता येते.

अवघ्या चार-पाच हजारात घरच्या घरी हे हवामान केंद्र तयार करता येतं. या हवामान केंद्रानं दिलेली माहिती ही ९५ टक्के अचूक असते. या हवामान केंद्राच्या मदतीनं उपग्रहांमार्फत पाच ते दहा किलोमिटर परिघातल्या हवामानाची इत्यंभूत माहिती मिळते. अशा हवामानकेंद्रांचा शेतकऱ्यांना विशेष फायदा होऊ शकतो.