Sanjay Raut Slams Ajit Pawar: "कालचे देशबुडवे एका रात्रीत देशभक्त कसे होतात ते महाराष्ट्रात दिसले," असं म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याच्या एका आठवड्यानंतर कठोर शब्दांमध्ये टीका करताना म्हटलं आहे. 'सामना'मधील 'रोखठोक'मधून राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर असलेल्या 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यापासून ते छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केल्याच्या मुद्दापर्यंत सर्वच गोष्टींचा उल्लेख करत सत्तेत नव्याने सहभागी झालेल्या अजित पवार गटाला लक्ष्य केलं आहे.
"देश बुडविण्याचा विरोधकांचा डाव हाणून पाडा!” असा आदेश भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथे दिला आणि पुढच्या 72 तासांत आपला देश बुडविणाऱ्यांपैकी महाराष्ट्रातील अजित पवारांसह जवळपास 40 आमदारांना भाजपात घेऊन ‘पवित्र’ करण्यात आले. याआधी असे अनेक ‘देशबुडवे’ भाजपाने पवित्र करून घेतले. आसामचे सध्याचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा हे अशाच देशबुडव्यांपैकी एक. आज हे महाशय पंतप्रधान मोदी व भाजपाचे गोडवे गात आहेत. पंतप्रधान आपल्या राजकीय विरोधकांना ‘देशबुडवे’ ठरवतात व त्याच देशबुडव्यांना भाजपात घेऊन सत्ता स्थापन करतात. अजित पवार यांच्यासह जवळपास 40 आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली व ते सरळ भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांच्यावर 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप स्वत: देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी यांनी केला. भाजपाचे एक शिलेदार किरीट सोमय्या यांनी कागलच्या हसन मुश्रीफांवर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. ‘ईडी’ने त्यांच्या अटकेची सर्व तयारी केली. मुश्रीफ हे तात्पुरत्या जामिनावर बाहेर होते. तेही आता अजित पवारांबरोबर भाजपाच्या गोटात गेले व मंत्री झाले. छगन भुजबळ यांच्याविरुद्ध मोहीम राबवणारे स्वत: फडणवीस व सोमय्या हेच होते. वळसे-पाटील, धनंजय मुंडेही गेले. भाजपात सामील झाल्यामुळे या सगळ्यांना आता शांत झोप लागेल. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर राजकीय हत्यारासारखा सुरू आहे. पाकिटमारांना आत टाकायचे व दरोडेखोरांना भाजपात प्रवेश देऊन शुद्ध करायचे असे एकंदरीत धोरण आहे. कालचे देशबुडवे एका रात्रीत देशभक्त कसे होतात ते महाराष्ट्रात दिसले,"
आधीच्या ‘रोखठोक’ सदरात आपण याबद्दल लिहिलं होतं असं सांगत संजय राऊत यांनी, "अजित पवारांसह आमदारांचा मोठा गट लवकरच राष्ट्रवादीतून बाहेर पडेल हे सांगितले, तेव्हा राज्यात व देशात खळबळ उडाली. राष्ट्रवादीतला आमदारांचा एक मोठा गट भाजपात निघाला आहे, हे तेव्हा खुद्द शरद पवार यांनी मान्य केले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीने हे सर्व पक्ष सोडत आहेत. प्रत्येकाची वैयक्तिक कारणे आहेत. ज्यांना जायचे त्यांनी जावे, पण पक्ष म्हणून त्यांना मी पाठिंबा देणार नाही," असं पवार म्हटल्याचं सांगितलं. "पवार यांनी तेव्हा एक चांगला मुद्दा मांडला होता तो म्हणजे, “आज जे ईडी वगैरेच्या भीतीने पक्ष सोडत आहेत त्यांना मी सांगतो, तुम्ही भाजपात गेल्याने टेबलावरची फाईल कपाटात जाईल, पण या फायली कधीच बंद होत नाहीत.” हसन मुश्रीफ यांनी भाजपात प्रवेश केला म्हणून त्यांची फाईल बंद केली तर ‘ईडी’ वगैरे यंत्रणांची आधीच घसरलेली विश्वासार्हता कायमची नष्ट होईल. 2024 साली दिल्लीत सत्तांतर होण्याची दाट शक्यता आहे व कपाटातल्या सर्व फायली पुन्हा टेबलावर येतील. छगन भुजबळ, स्वत: अजित पवार हे ईडी-पीडित आहेत. वळसे-पाटलांचे काय? हे रहस्य आहे. भुजबळांवर भ्रष्टाचाराचे अनेक गुन्हे असताना तुरुंगातून सुटून आल्यावर पवारांनी त्यांना महाराष्ट्रात मंत्री करून प्रतिष्ठा दिली. आता हे गुन्हे काढण्यासाठी ते भाजपात गेले," असं राऊत यांनी म्हटलं आहे.
"प्रफुल पटेल यांच्या राहत्या घराचे दोन मजले ‘ईडी’ने जप्त केले व तेथे ‘ईडी’चेच कार्यालय थाटले. त्यामुळे पटेलांना झोप कशी लागेल? आता नव्या राजकीय नाट्यामुळे पटेल यांना शांत झोप लागेल. पटेल यांनी इक्बाल मिरचीबरोबर कसे व्यवहार केले हे एकदा स्वत: मोदी यांनी भाषणात सांगितले. आता मिरच्यांचा ‘गोड हलवा’ झाला! संपूर्ण भारतातील देशबुडव्यांचा मातृपक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे पाहायला हवे. श्री. मोदी बोलतात एक व प्रत्यक्ष कृती दुसरी करतात. हे चित्र आज सर्वत्र दिसते. अजित पवारांसोबत जे गेले त्या प्रत्येकाचे वैयक्तिक दु:ख होते. मुश्रीफ यांच्या कुटुंबियांवर वारंवार ‘ईडी’च्या धाडी पडल्या. तेव्हा मुश्रीफ यांच्या पत्नी बाहेर येऊन त्राग्याने म्हणाल्या, “रोज रोज का छळ करताय? एकदाच काय ते आम्हाला गोळ्या घालून मारा!” भाजपाने ‘ईडी’च्या माध्यमातून छळलेल्या अनेक कुटुंबांची हीच वेदना आहे," असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
"महाराष्ट्रात भाजपा व शिंदे गटाचे मिळून 165 आमदारांचे बहुमत असतानाही भाजपाने अजित पवारांना फोडले व आणखी 40 आमदार बहुमतास जोडले. यामुळे सगळ्यात मोठा पचका झाला तो मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या आमदारांचा. त्यांची ‘बार्गेनिंग पॉवर’च आता संपली. “आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आहात,” असे भाजपाला सुनावणाऱ्यांची तोंडे आता पडली, हे पहिले व अजित पवार आम्हाला निधी देत नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला गिळत होती म्हणून आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो, असे सांगायची सोय आता राहिली नाही. सगळेच ढोंग उघडे पडले," असा टोला राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
"भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली. त्या भुजबळांच्या मांडीस मांडी लावून मंत्रिमंडळात कसे बसू? म्हणून शिवसेना सोडली, असे मुख्यमंत्री शिंदे शिवसेना सोडताना सांगत होते. तेच भुजबळ आता शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आले व शिंदे यांनी ते स्वीकारले. बाळासाहेब ठाकरेंना अटक करणाऱ्या भुजबळांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची हिंमत त्यांच्यात नाही. त्यामुळे शिवसेना हे नाव व बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र लावून त्यांनी दिशाभूल करू नये. महाराष्ट्रात ढोंग चालत नाही. ढोंगावर लाथ मारा असे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगत, पण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ढोंग्यांचा बाजार भरला आहे!" असं राऊत म्हणाले आहेत.
"भुजबळांचे नव्या व्यासपीठावरचे भाषण मी ऐकले, “शरद पवार यांच्याभोवती बडवे जमले आहेत.” कालपर्यंत हेच बडवे तुमचे सहकारी होते. छगन भुजबळ हे शिवसेनेत होते. महाराष्ट्र अस्मितेविषयी त्यांना प्रेम आहे, पण महाराष्ट्र कमजोर करणाऱ्या शक्तींना पाठबळ देण्याचे काम भुजबळांसारखे नेते आज करीत आहेत. भारतीय जनता पक्षाबरोबर राहून अजित पवार, भुजबळ, मुश्रीफ वगैरे नेते ‘बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,’ अशी घोषणा करू शकतील काय? बेळगावात मराठी माणसांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवू शकतील? विधानसभेत पाशवी बहुमत जमवून स्वतंत्र विदर्भाचा म्हणजे महाराष्ट्र तोडण्याचा प्रस्ताव ते आणू शकतात. महाराष्ट्रातून सर्व उद्योग गुजरात राज्याकडे खेचून नेले जात आहेत. मुंबईचे महत्त्व आता कमी करायचे व भविष्यात मुंबई वेगळी करायची, हे सध्याच्या दिल्लीश्वरांचे धोरण आहे," असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
"एकनाथ शिंद्यांपासून अजित पवार, भुजबळांपर्यंत हे सर्व लोक या महाराष्ट्र द्रोहाविरुद्ध आवाज उठविण्याच्या स्थितीत आता नाहीत. 105 आमदारांचा पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष, पण शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 80 आमदार फोडून त्यांच्या हाती राज्याच्या चाव्या दिल्या. लुटीचा खुला परवाना दिला. हा देश बुडवण्याचाच प्रकार आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष त्यांनी लावला. आता अजित पवार विरुद्ध शरद पवार असा संघर्ष लावून भाजपाचे व्यापारी बादशहा दिल्लीत बसून मजा बघत आहेत," असं राऊत म्हणालेत.
"‘देश बुडवणाऱ्यांनी भाजपात यावे, नाहीतर तुरंगात जावे!’ असा संदेश या बादशहांनी दिला. ज्यांनी भ्रष्टाचार केला व देश बुडवण्यात जे सामील तेच लोक बादशहांपुढे शरण जात आहेत. अजित पवार व त्यांच्या नव्या सहकाऱयांच्या शपथविधीनंतर समाजमाध्यमांवर लोक मिश्कील पद्धतीने व्यक्त होत आहेत, “पवार, मुश्रीफ, भुजबळांच्या शपथविधीनंतर किरीट सोमय्यांच्या दाराबाहेर आपापल्या भ्रष्टाचाराच्या फायली घेऊन लोकांनी गर्दी केली आहे. आमच्या भ्रष्टाचाराविरुद्ध बोंब उठवा. म्हणजे आम्हालाही मंत्री होता येईल,” असे हे लोक सांगत आहेत," असं लेखात म्हटलं आहे.
"अजित पवार यांनी त्यांच्या पहिल्या भाषणात आपला कसा छळ झाला ते सांगितले. यावर सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी समाजमाध्यमांवर मार्मिक टिप्पणी केली आहे, “खरंच खूप सहन केलं. सात वेळा आमदारकी, एक वेळ खासदारकी, पंधरा वर्षं मंत्री, चार वेळा उपमुख्यमंत्री, एकदा विरोधी पक्षनेते! खूपच सहन केले. दुसरा कोणी पुतण्या असता तर कधीच सोडून गेला असता!” देशबुडव्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची हास्यजत्राच केली आहे!," असं राऊत यांनी लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.