मुंबई : पूर्वी अंडरवर्ल्डची चलती होती. तेच ठरवायचे कोणाला काय द्यायचे. अनेक राजकीय नेते त्यांच्या इशाऱ्याने वागायचे. तसेच मुंबईत सत्ताधारी कोण हवा, याचाही तेच निर्णय घ्यायचे. त्यांची तशी दहशत होती. मात्र, मी त्यावेळीही घाबरत नव्हतो. मी डॉन दाऊद इब्राहिमशीही बोललो आहे. त्याचा फोटो काढला आहे. एवढेच नाही, त्याला मी दम देखील दिला आहे, असे बेधडक वक्तव्य शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
संजय राऊत यांची पत्रकारितेची सुरुवात ही क्राईम रिपोर्टींगने सुरु झाली. त्यावेळी त्यांनी डॉन संदर्भातील बातम्या केल्या. पूर्वी राजकारणावर आणि सत्ताधाऱ्यांवर अंडरवर्ल्डचा दबदबा तसेच वर्चस्व दिसून आले आहे. आताची परिस्थिती नाही. आता सगळे बदलले आहे. मी कोणालाही घाबरत नव्हतो. मला मरणाची आणि तुरुंगात जाण्याची भिती नव्हती आणि नाही. त्यामुळे मी कोणालाही डिवचण्याचे काम करतो. त्यामुळे होते काय, समोरचा बोलतो तो आतून बोलतो, असे राऊत यांनी सांगितले. पुण्यात आयोजित जाहीर कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलास आणि परखड उत्तरे दिलीत.
मी सुरुवातीपासून बेधडक बोलतो आणि लिहितो. जे केले ते केले. त्यात माघार नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श माझ्यापुढे होता. त्यामुळे त्यांच्याप्रमाणे आपले आहे. करायचे ते मनापासून आणि बोलायचेतेही मनापासून रोखठोक. पुढे होईल ते होईल. मी बोललो ते बोललो, त्यात फरक नाही. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे माझी फायर ब्रँड एडिटर अशी अनेक ओळख करून द्यायचे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
आपला पत्रकारितेतील आपल्या कारकिर्दीबद्दल बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, रमा नाईकची अंत्ययात्रा काढण्यात येत होती. त्यावेळी संजय राऊत अंत्ययात्रा काढण्यात येत असलेल्या गाडीवर चढले होते, असा ज्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यामुळे मी दाऊद इब्राहिम पासून अनेकांचे फोटो काढले आहेत. दाऊद इब्राहिमला दम देखील दिला आहे. त्यामुळे मला त्याचे काहीही वाटत नाही. आताचे ब्रेकिंग आणि लाईव्ह दाखवतात ना, ते रमा नाईक अंत्ययात्रेच्यावेळी केले, असे सांगून त्यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले. मी हे बिनधास्त करतो आणि लिहोतोही परखड. लेखणीत धारअसल्याने बाळासाहेब ठाकरे माझी फायर ब्रँड एडिटर अशी अनेक ओळख करून द्यायचे, अशी आठवणही यावेळी त्यांनी सांगितली.
संजय राऊत यांनी या मुलाखतीतून भाजपला आणि विरोधी पक्षनेत्यांना नाव न घेता कानपिचक्या दिल्यात. 'खलनायक' हा समाजाचा भाग आहे. माझ्या आसपास खलनायक फिरत असतात. आम्ही त्यांना बघतो. आमच्या पक्षात कोणीही खलनायक नाही. पण ज्या संजय राऊत यांच्यामुळे आम्हाला सत्ता मिळाली नाही, असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी मी खलनायक आहे, असेही यावेळी ते म्हणाले. त्याचवेळी रोज सकाळी सामना कोणी वाचला नाही तरी रोज टीव्हीवर सामना पाहायला मिळतोच यापेक्षा जास्त भाग्य कुठले, असा टोला यावेळी संजय राऊत यांनी लगावला.
आम्ही सरकार स्थापन केले. पहिल्या दिवसापासून तुटून पडत आहे. टीका करण्याची संधी सोडत नाही. त्यांना एवढेच सांगणे आहे, आधी आम्हीला काम करु द्या. जो काम करतो तो चुकतो. काम करु द्या, नंतर टीका करा. वर्षभरात काम होण्याचीही वाट पाहिली जात नाही. आज जे सरकार आहे. ते पाचवर्ष टिकेल. ते चांगले काम करेल. आम्ही पाच वर्षांचे नियोजन केले आहे. सरकारचा आराखडा आणि कोणाला किती मंत्री द्यायचे हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठरवले. त्यांनी ते गणित मांडले आहे. त्यामुळे कोणाला किती मंत्रीपदे गेलीत, हे गौण आहे. मुख्यमंत्री कोणाचा आहे. ते बघा. आज जे सरकार स्थापन झाले आहे त्याला कोणीही खिचडी म्हणत नाही. त्याला सरकार म्हणतात. कारण त्याचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे करत आहेत आणि त्यांचे मार्गदर्शन शरद पवार करतात, असे यावेळी संजय राऊत यांनी सांगितले.
आम्ही सरकार पाच वर्ष चालवणार आहोत. शरद पवार साहेबांनी पाहिल्या दिवसापांसून सांगितले की, आपण हे करू शकतो, काही नवीन घडवू शकतो. हे सरकार बनवायचे आणि टिकवायचे. आम्ही हे सरकार पाच वर्ष चालवणार, असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.