शरद पवारांच्या भेटीनंतर संजय काकडेंची प्रतिक्रिया

या भेटीनंतर संजय काकडे यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Updated: Nov 24, 2019, 10:39 AM IST
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय काकडेंची प्रतिक्रिया  title=

मुंबई : भाजप खासदार संजय काकडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटील सिल्व्हर ओकला गेले आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे देखील यावेळी उपस्थित होते. यामुळे राजकारणात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. संजय काकडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. भाजपातर्फे मध्यस्थी करण्याच्या वेळेस संजय काकडे यांना पाठवण्यात येते. अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन ते आले आहेत का ? अशी चर्चा सुरु झाली. 

या भेटीनंतर संजय काकडे यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपण वैयक्तिक कारणांसाठी शरद पवार यांची भेट घेतल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. पण या भेटीत खलबत झाली असणार यावर चर्चांना उधाण आले आहे. भाजपसोबत सत्ता स्थापन करणाऱ्या अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे पाच आमदार आहेत. त्यांची मनं वळवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करत आहेत. या आठवड्यापर्यंत भाजपला आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. हे भाजपसमोरचे मोठे आव्हान आहे. शिवसेना आणि काँग्रेसने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवले आहे. त्यामुळे आपले आमदार फुटणार नाहीत अशी दोन्ही पक्षांना खात्री आहे. 

या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीचे आणि अपक्ष आमदार गळाला लावण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. यात जर राष्ट्रवादी पक्षाने पाठींबा दिल्यास भाजपचे काम सोपे होऊ शकते. राष्ट्रवादी पक्ष फुटण्यापासून वाचायचा असेल तर पाठींबा द्या असा संदेश अजित पवारांनी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याच पार्श्वभुमीवर काकडेही हाच संदेश घेऊन आले असतील का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात

देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निर्णय रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी  मागणी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत अशीही मागणी केली आहे.  या प्रकरणात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना प्रतिवादी केले. तसेच केंद्र आणि राज्य सरकारला प्रतिवादी करण्यात आले आहे. न्यायमूर्ती एन व्ही रमण्णा, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. 

कोणत्या मागण्या  ?

१. आजच (रविवारी) विधीमंडळात फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश द्यावे.
२. आजच विधानसभा सदस्यपदाची शपथ द्यावी.
३. राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या आधारावर शपथविधीसाठी निमंत्रण पाठवले. त्या संदर्भात कागदपत्रे सादर करावी. (कर्नाटकात जी परमेश्वरराव केसमध्ये सुप्रीम कोर्टानं कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याचा संदर्भ देऊन मागणी केलीय.)
४. फ्लोअर टेस्टचं व्हिडीओ रेकाँर्डींग करावं आणि त्याची काँपी सर्वोच्च न्यायालयात सादर करावी.
५. फ्लोअर टेस्ट घेण्यासाठी विधानसभेचा अध्यक्ष निवडण्यात यावा.
६. विधीमंडळात शक्तीप्रदर्शन चाचणीवेळी समर्थन आणि विरोधी गट तयार करावे. त्यानंतरच मतमोजणी करावी. म्हणजे समर्थनातील एका बाजूला उभे करावे आणि समर्थन नसलेले दुसऱ्या बाजूला उभे करावे. 
७. फ्लोअर टेस्ट होई पर्यंत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्यासंदर्भातचे कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ नये.