उपचार न करता हॉस्पीटलनंच निर्जन स्थळी फेकून दिलं... एकाचा मृत्यू

मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील एक अधिकारी आणि एका कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Updated: Nov 10, 2019, 04:32 PM IST
उपचार न करता हॉस्पीटलनंच निर्जन स्थळी फेकून दिलं... एकाचा मृत्यू  title=

रवींद्र कांबळे, झी २४ तास, सांगली : उपचारासाठी दाखल असलेल्या तीन रुग्णांना उपचार न करता सांगलीत निर्जन रस्त्यावर फेकून दिल्याबद्दल हॉस्पीटलच्या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील 'मिरज सिव्हील हॉस्पिटल'मध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलंय. या प्रकरणी सिव्हिल प्रशासनाने महात्मा गांधी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावर कारवाई करत रुग्णालयाचे समाजसेवा अधिक्षक अनिल नरसिंगकर यांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईमुळे सिव्हिल कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. 

मिरज सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या तीन रस्त्यावर तीन अत्यवस्थ रुग्णांना कर्मचाऱ्यांनी उपचाराऐवजी बाहेर टाकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या रुग्णांना नंतर 'सांगली सिव्हील हॉस्पिटल'मध्ये उपचारास दाखल करण्यात आले. त्यापैंकी शिवलिंग कुचनुरे (रा. गणेशवाडी, ता. शिरोळ) यांचा मृत्यू झाला होता.

काय घडलं नेमकं 'त्या' रात्री?

२ नोव्हेंबर रोजी रात्री सांगलीत जुना कुपवाड रस्त्यावर निर्जन रस्त्यावर तीन मृतदेह पडल्याच्या अफवेमुळे नागरिकांनी तेथे धाव घेतली. यावेळी अंधारात तीन अत्यवस्थ रुग्ण रस्त्यावर पडल्याचं आढळलं. नागरिकांनी संजयनगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी गंभीर अवस्थेतील तिघांना सांगली सिव्हीलमध्ये उपचारास दाखल करण्यात आलं. यावेळी, उपचारादरम्यान शिवलिंग कुचनुरे यांचा मृत्यू झाला.

मिरज सिव्हीलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या शंकर शिंदे, पीरसाब मोमीन व शिवलिंग कुचनुरे या तिन्ही रुग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेत असल्याचं सांगत रुग्णालयाबाहेर काढण्यात आलं होतं. परंतु, त्यांना सांगलीत निर्जन स्थळी रस्त्यावर आणून फेकल्याचं निष्पन्न झालंय. उपचाराअभावी शिवलिंग कुचनुरे यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

स्थानिक नेत्याच्या हस्तक्षेपानंतर...

या घटनेबाबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर यांनी अधिष्ठाताकडे निवेदन देऊन मिरज सिव्हीलमधील संबंधित डॉक्‍टर व कर्मचार्‍यांना नोकरीतून बडतर्फ करुन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी सिव्हिल प्रशासनाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर अत्यवस्थ रुग्णांना विनापरवाना बाहेर टाकणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध वैद्यकीय अधिक्षक डॉ. दत्ता भोसले यांनी शुक्रवारी रात्री गांधी चौक पोलिसांत फिर्याद दिली. 

शिवलिंग कुचनुरे यांच्या मृत्यू प्रकरणी मिरज सिव्हिलचे समाजसेवा अधीक्षक अनिल नरसिंगकर व सफाई कर्मचारी सागर साळोखे या दोघांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल नरसिकर यांना पोलिसांनी अटक केली नरसिंगकर यांना न्यायालयाने ११ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली असून या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग निष्पन्न होण्याची शक्यता असल्याचे गांधी चौक पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.