रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सांगली पोलीस दलात 'ई संवाद' या कार्यप्रणालीला सुरुवात झाली आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात येणार्या तक्रारदाराला व्हिडीओ कॉन्फरंन्सीद्वारे पोलीस अधीक्षकांसमोर आपली समस्या मांडता येणार आहे. आज पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील तक्रारदारांकडून व्हिडीओ कॉन्फरंन्सीद्वारे तक्रारी जाणून घेतल्या आणि तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.
अनेक पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दिल्यानंतरही त्यावर कारवाई होत नसल्याचे अनुभव नागरिकांना येतात. ग्रामीण भागात पीडित व्यक्तींना पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी सांगली पर्यंत येणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा लोकांना न्याय मिळेलच अशी स्थिती नसते. मात्र सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांच्या तक्रारी नोंद करून घेण्यासाठी अनोखा उपक्रम राबवला आहे.
आज तक्रार निवारण दिनी 'ई संवाद व्हिडीओ कॉन्फरंन्सींग' प्रणालीची सुरुवात करण्यात आहे. सांगलीचे पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी आज सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याशी व्हिडीओ कॉन्फरंन्सीद्वारे जोडुन ई संवाद साधला यावेळी अनेक तक्रारदारांनी आपल्या समस्या आणि तक्रारी पोलीस अधिक्षकांच्या समोर मांडल्या.
कारवाई होत नसेल किंवा कारवाईला वेळ लागत असेल तर एखाद्या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदाराला पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात. गुन्हा नोंद असलेले पोलीस स्टेशन हे पोलीस अधीक्षक कार्यालयापासून दूर असते. मात्र या कार्यप्रणालीमुळे प्रत्येक आठवड्याला स्वतः पोलीस अधिक्षक प्रत्येक पोलीस स्टेशनशी व्हिडीओ कॉन्फरंन्सीद्वारे संपर्क साधत तक्रारदारांच्या समस्या ऐकून घेऊन पोलिसांना सूचना देऊ शकणार आहेत.